फिलिपाईन्स (Philippines) मध्ये अजूनही चक्रीवादळ वामको (Typhoon Vamco)चा कहर चालू आहे. रविवारी माहिती देताना राष्ट्रीय आपत्ती एजन्सीने सांगितले की या भयंकर वादळामुळे फिलिपिन्समध्ये मोठी नासधूस झाली आहे. या वादळामुळे आतापर्यंत 67 लोकांचा बळी गेला आहे. मृतांची संख्या अजून वाढू शकते असे एजन्सीने म्हटले आहे. त्याचबरोबर नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन आणि मॅनेजमेंट काउंसिलने म्हटले आहे की, देशात चक्रीवादळामुळे 12 लोक बेपत्ता आहेत.
वामको वादळामुळे बुधवारी रात्रीपासून देशातील अनेक भागात जोरदार वार्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. अतिवृष्टीमुळे परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू आहे. उत्तर फिलिपिन्स प्रांतातील पूरग्रस्तांना अन्न व शुद्ध पाणी पुरविण्यात येत आहे. रविवारी दोन प्रांतांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे बरीच गावे पाण्याखाली गेली आहेत. अल्काला सिटी आपत्ती अधिकारी जॅसिंटो अॅडव्हंटो यांनी स्थानिक रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. ते म्हणाले की, हरवलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.
आपत्ती अधिकाऱ्याने सांगितले की, अलकाला शहरात किमान 12,000 केंद्रे निवारा उभारण्यात आली आहेत. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे प्रमुख एसीसो मॅकलन म्हणाले की, या पूर परिस्थितीमध्ये काही नागरिकांनी त्यांचे घर सोडण्यास नकार दिला व अशा लोकांनी घराच्या छतावर आश्रय घेतला आहे. राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते (Rodrigo Duterte) यांनी शुक्रवारी बाधित भागाची हवाई पाहणी केली. त्यांनी सर्व स्थानिक प्रशासनांना मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे.
(हेही वाचा: अमेरिकेत डोनाल्ड ट्रंम्प यांना समर्थन, निवडणूकीच्या निकालाविरोधात हजारोंच्या संख्येने नागरिकांचे आंदोलन)
राष्ट्रपती म्हणाले की, पीडितांचे कल्याण आणि सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. निवारा स्थळांवर मदत करणे व आर्थिक सहाय्य करणे यास सरकार वचनबद्ध आहे, असे आश्वासन राष्ट्रपतींनी लोकांना दिले. मंगळवारी हवामान खात्याने इशारा दिला की, 'वाकामो' वादळामुळे पॉलीलिओ बेटात जबरदस्त लँडफॉलचा धोका उद्भवू शकतो. देशाच्या उत्तर प्रांतांमध्ये शेतीचे नुकसान होण्याचाही इशारा देण्यात आला होता.