मुंबईमधील (Mumbai) पाऊस (Heavy Rain) हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात होणाऱ्या मुंबईच्या स्थितीमुळे सर्वांनाच अनेक समस्यांना समोर जावे लागते. याआधी अनेकदा मुंबईमधील सांडपाण्याचा निचऱ्याबाबत बीएमसीवर (BMC) ताशेरे ओढले गेले आहेत. आता पश्चिम उपनगरातील बर्याच भागातील पूरग्रस्त स्थिती कमी करण्याचा प्रयत्न म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंधेरी व मालाड दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, त्यांच्या नाल्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. यावर्षी शहरातील हवामान, पावसाचे प्रमाण याची दखल घेऊन बीएमसीने हा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.
बीएमसीने संपूर्ण मुंबईतील तीव्र पूरग्रस्त ठिकाणांच्या मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची योजना आखली आहे. याचा एक भाग म्हणून पश्चिम उपनगरातील 19 तीव्र पूरग्रस्त ठिकाणी नाल्यांची दुरुस्ती, पुनर्रचना व रुंदीकरणाची विविध कामे केली जाणार आहेत. यासाठी बीएमसीने 160 कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की काही कामे ही योग्यरित्या नियोजित केली गेली आहेत, जेणेकरून पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करता येईल. परंतु काही महत्त्वपूर्ण काम पुढील दोन ते तीन वर्षांत पूर्ण होतील. या कामांमध्ये मुख्यतः वृंदावन हॉटेल ते मालाडमधील मार्वे रोड जंक्शनपर्यंत, एसव्ही रोड नाल्यावरील बॉक्स नाल्यांचे नव्याने मॉडेलिंग किंवा नवीन बांधकाम समाविष्ट आहे.
सर्व प्रभाग कार्यालयांना स्थानिक पातळीवर जिथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते अशी ठिकाणी ओळखण्यास सांगितले आहे. या जागा 6 महिन्यांच्या अल्प कालावधीत ठीक करण्यात येणार आहेत. या उपाययोजनांमुळे पावसाळ्यात जास्त प्रमाणात साचणारे पाणी मोठ्या नाल्यांतून सहज जाऊ शकते. हे काम जानेवारीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अतिरिक्त पावसाचे पाणी साचण्यासाठी शहरात बीएमसी पूर टँक तयार करण्याचा विचार करीत आहे. या टाक्या टोकियोच्या भूमिगत पाण्याची साठवण करणाऱ्या टाक्यांच्या धर्तीवर तयार केल्या जातील. (हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी आनंदाची बातमी; दिवाळी निमित्त मुंबईतील अनेक कोविड सेंटर्सने घेतला 'हा' निर्णय)
दरम्यान, यावर्षी शहरात पावसाळ्यात अनेक भागात पूर आणि पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून, विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी, मालाड, गोरेगाव, हिंदमाता, सायन आणि किंग सर्कल यासारख्या भागात बऱ्याच काळासाठी पाणी साचत असे. लॉकडाऊनमुळे यावर्षी नाल्यांच्या साफसफाईच्या कामात उशीर झाल्याने असे घडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.