प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) योग्य ती खबरदारी घेऊन प्रत्येकजण दिवाळीचा सण साजरा करत आहेत. परंतु, कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याने दिवाळीचा (Diwali) सण असूनही अनेकांना कोविड रुग्णालयात राहण्याची वेळ आली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना कोविड सेंटरमध्ये (COVID Centre) येण्याची परवानगी नसल्यामुळे त्यांना घरच्या जेवणाची चव घेता येत नाही. मात्र, अशाच रुग्णांसाठी एक आनंददायी बातमी समोर येत आहे. मुंबईतल्या अनेक रुग्णालयांनी आणि कोविड केअर सेंटर्सनी रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या रुग्णांसाठी घरुन फराळ पाठवण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात दिली आहे.

मुंबईत 5 हजाराहून 700 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांवर विविध क्वारंटाइन सेंटर्स आणि रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यांपैकी 1 हजार 200 हून अधिक रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आयसीयू मधील रुग्णांना वगळता इतर रुग्णांना घरचा फराळ चाखता येणार आहे. तर, आयसीयूत दाखल रुग्णांसाठी दिवाळीनिमित्त जास्त काही करता येण्यासारख नाही. यामुळे त्यांना कुटुंबियांशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयसीयूमध्ये नातेवाईकांना प्रवेश देणे हा मोठा धोकादायक ठरु शकतो. हे देखील वाचा- महाराष्ट्रातील भाविकांसाठी खूषखबर! 16 नोव्हेंबरपासून मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं खुली करण्यास राज्य सरकारची परवानगी

 दिवाळीचा सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळी साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच फटके देखील न फोडण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी साधेपणाने साजरा करावी लागणार आहे.