Joe Biden, Vladimir Putin (PC - Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. या संभाषणात दोन्ही राष्ट्रप्रमुखांनी युक्रेनवर चर्चा केली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा सुमारे 62 मिनिटे चालली. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, व्हाईट हाऊसने सांगितले की, बायडेन यांनी शनिवारी सकाळी 11:04 वाजता पुतीन यांच्याशी फोनवर संभाषण केले. या संभाषणात बिडेन यांनी पुतीन यांना सांगितले की रशियाच्या युक्रेनवर आक्रमणाचा परिणाम "व्यापक मानवी पीडा" असेल. बायडेन यांनी पुतीन यांना सांगितले की, अमेरिका युक्रेनवर मुत्सद्देगिरी सुरू ठेवेल. परंतु 'इतर परिस्थितींसाठी तितकेच तयार' आहे. बायडेन यांनी पुतीन यांना पुन्हा युक्रेनच्या सीमेजवळ जमलेले रशियन सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, बायडेन यांनी रशियाला चेतावणी दिली की, युक्रेनवर आक्रमण केल्यास अमेरिका आणि त्यांचे सहयोगी "कठोरपणे प्रत्युत्तर देतील आणि मोठी किंमत मोजतील". (वाचा - ऑटोमेशनच्या जगात अमेरिकेचे मोठे यश! Black Hawk Helicopter ने केलं पायलटशिवाय उड्डाण; पहा व्हिडिओ)

यापूर्वी व्हाईट हाऊसने गुप्तचर अहवालाचा हवाला देत म्हटले होते की, रशिया लवकरचं युक्रेनवर हल्ला करू शकतो. बिडेन यांच्याशी बोलण्यापूर्वी पुतिन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. संकट सोडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मॅक्रॉन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मॉस्कोमध्ये पुतीन यांचीही भेट घेतली. रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखाहून अधिक सैन्य जमा केले आहे आणि शेजारच्या बेलारूसमध्ये सरावासाठी आपले सैन्य पाठवले आहे. मात्र, आपण युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचा रशियाने सातत्याने नकार दिला आहे.

दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव येथील दूतावासातून बहुतांश अमेरिकन कर्मचाऱ्यांना माघार घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शनिवारी म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शांतता दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शनिवारी क्रिमियाजवळ लष्करी सराव पाहिला. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाचा ताबा घेतला होता. झेलेन्स्की म्हणाले, "आम्ही घाबरत नाही, आम्ही घाबरलो नाही. सर्व काही नियंत्रणात आहे."

ब्रिटननेही आपल्या नागरिकांना शनिवारी युक्रेन सोडण्यास सांगितले. त्याच वेळी, संकट आणखी वाढवत, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पोलंडमध्ये 3000 अतिरिक्त अमेरिकन सैनिक पाठवण्याचे आदेश दिले आहेत. युक्रेनियन सैन्याला प्रशिक्षण देणारे ब्रिटीश सैनिकही देश सोडण्याची योजना आखत आहेत. जर्मनी, नेदरलँड आणि इटलीने आपल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर पडण्यास सांगितले आहे. कॅनडा, नॉर्वे आणि डेन्मार्कनेही आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि त्यांचे रशियन समकक्ष सेर्गेई शोइगु यांनीही शनिवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया बुधवारी हल्ला करू शकतो अशी गुप्तचर माहिती मिळाली होती. मात्र, ही माहिती किती भक्कम आहे, याबाबत काहीही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी युक्रेनमध्ये राहणाऱ्या सर्व अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, रशियन हल्ल्यानंतर हवाई सेवा किंवा रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यास अमेरिकन नागरिकांना अमेरिकन सैन्याने बाहेर काढण्याची अपेक्षा करू नये. दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, "शांतता राखणे, एकजूट राहणे आणि शांतता बिघडवणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या कृत्यांपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे."