Nepal Plane Crash: नेपाळी लष्कराला मोठे यश, 22 जणांना घेऊन गेलेल्या विमानाचे अवशेष सापडले; मृतदेहांचा शोध सुरू
Crashed Tara Air aircraft (PC - ANI)

Nepal Plane Crash: नेपाळ (Nepal) मधील पोखरा या पर्यटन शहरातून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हिमालयाच्या डोंगराळ भागात कोसळलेल्या तारा एअर (Tara Air) च्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराला मुस्तांगमधील थासांग-2 च्या सानोसवेयरमध्ये दुर्घटनाग्रस्त तारा एअरचे विमान सापडले आहे. याआधी खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे विमानाचा शोध घेणे कठीण झाले होते. राजधानी काठमांडूपासून 200 किमी पूर्वेला असलेल्या पोखरा येथून सकाळी 10.15 वाजता या विमानाने उड्डाण केले होते.

दुर्घटनाग्रस्त विमान पश्चिमेकडील टेकड्यांमधील जोमसोम विमानतळावर उतरणार होते. परंतु पोखरा-जोमसोम हवाई मार्गावर या विमानाचा आकाशातील टॉवरशी संपर्क तुटला. 'तारा एअर'च्या 'ट्विन ऑटर 9एन-एईटी' विमानात चार भारतीय नागरिक, दोन जर्मन नागरिक आणि 13 नेपाळी प्रवासी आणि तीन नेपाळी क्रू सदस्य होते. कॅनेडियन बनावटीचे हे विमान पोखरा येथून मध्य नेपाळमधील प्रसिद्ध पर्यटन शहर जोमसोमला जात होते. दोन शहरांमधील विमान प्रवास साधारणपणे 20-25 मिनिटांचा होता. मात्र, हे विमान जोमसोमला पोहोचू शकले नाही. (हेही वाचा - Nepal Tara Air Crash: सहा तासांनंतर सापडले तारा एअरचे विमान; 4 भारतीयांसह 22 प्रवाशांचा होता समावेश)

दरम्यान, एअरलाइन्सने प्रवाशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी, त्यांची पत्नी वैभवी बांदेकर (त्रिपाठी) आणि त्यांची मुले धनुष त्रिपाठी आणि रितिका त्रिपाठी अशी भारतीयांची नावे आहेत. हे कुटुंब ठाण्यात राहत होते. क्रू मेंबर्सचे नेतृत्व कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे करत होते, असं पोखरा विमानतळाचे माहिती अधिकारी देव राज अधिकारी यांनी सांगितले. उत्सव पोखरेल हे सहचालक आणि किस्मी थापा फ्लाइट अटेंडंट म्हणून विमानाच्या क्रूमध्ये होते.