Tehreek-E-Taliban Ends Ceasefire: पाकिस्तानी तालिबानने सरकारसोबत युद्धविराम संपवला; अतिरेक्यांना संपूर्ण पाकिस्तानमध्ये हल्ले करण्याचे आदेश, देश अलर्टवर
Taliban (Photo Credits: Getty Images)

प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehreek-e-Taliban Pakistan-TTP) ने सोमवारी पाकिस्तान सरकारसोबत (Pakistan Government) गेल्या जूनमध्ये केलेला, अनिश्चित काळासाठीचा युद्धविराम करार (Indefinite Ceasefire) रद्द केला. टीटीपीने आपल्या सैनिकांना संपूर्ण पाकिस्तानात हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘विविध भागात मुजाहिदीन (दहशतवादी) विरुद्ध लष्करी कारवाया केल्या जात आहेत, त्यामुळे देशभरात जेथे शक्य असेल तेथे हल्ला करणे तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे.’

इंग्लंडचा क्रिकेट संघ 17 वर्षांनंतर पाकिस्तानात पोहोचल्यानंतर एका दिवसाने हे वक्तव्य आले आहे. अशात पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा मंगळवारी निवृत्त होणार आहेत. टीटीपीला पाकिस्तानी तालिबान असेही म्हटले जाते. टीटीपीची स्थापना 2007 मध्ये विविध दहशतवादी संघटनांचा संयुक्त गट म्हणून करण्यात आली होती. टीटीपीने पाकिस्तानसोबत युद्धविराम करार केला होता. आता खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू आणि लक्की मारवत भागात लष्कराकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांनंतर, हा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिबंधित गटाने म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘युद्धविराम उल्लंघनाबाबत लोकांना अनेकदा चेतावणी दिली, परंतु तरीही संयम दाखवला जेणेकरून संवाद प्रक्रिया विस्कळीत होऊ नये. परंतु लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी सततचे हल्ले थांबवले नाहीत. आता देशभरात आमचा पलटवार सुरू होईल.’ टीटीपीच्या वक्तव्यावर सरकार आणि गुप्तचर यंत्रणांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारच्या मदतीने टीटीपीशी बोलणी सुरू केली होती, मात्र त्यात कोणतीही प्रगती होऊ शकली नाही. (हेही वाचा: चीनमधील कठोर निर्बंधांविरोधात रस्त्यावर उतरले लोक; लॉकडाउन संपवण्यासाठी दिल्या घोषणा)

याआधी 2012 मध्ये मलाला युसुफझाईवर टीटीपीने हल्ला केला होता ज्यामध्ये गोळी लागल्याने ती जखमी झाली होती. त्यावेळी तिला प्रथम पेशावर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर उपचारासाठी लंडनला नेण्यात आले होते. हल्ल्याची जबाबदारी घेत टीटीपीने मलाला ही पाश्चात्य विचारसरणीची मुलगी असल्याचे म्हटले होते. मलालाला नंतर नोबेल पारितोषिक देण्यात आले.