COVID Protests in China: चीनमधील कठोर निर्बंधांविरोधात रस्त्यावर उतरले लोक; लॉकडाउन संपवण्यासाठी दिल्या घोषणा
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

COVID Protests in China: चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर निर्बंधांविरोधात लोकांचा संयम सुटू लागला आहे. चीनच्या पश्चिम शिनजियांग (Xinjiang) भागात कोरोना निर्बंधांविरोधात सार्वजनिक निदर्शने (COVID Protests) सुरू झाली आहेत. आंदोलक लॉकडाऊन संपवण्याची मागणी करत आहेत. यापूर्वी दक्षिण चीनमधील ग्वांगझू शहरात निर्बंधांचे नियम मोडून लोक घराबाहेर पडले होते.

चीनने विस्तीर्ण शिनजियांग प्रदेशात लागलेल्या लॉकडॉऊनमध्ये सुमारे 40 लाख लोकांचा सहभाग आहे. येथील लोकांना 100 दिवस घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांत शहरात जवळपास 100 नवीन रुग्ण आढळले आहेत. शिनजियांगमध्ये एक कोटी उइगर लोक राहतात. (हेही वाचा - Vaccinated People Deaths In US Survey: धक्कादायक! अमेरिकेत लसीकरण झालेल्या 58 टक्के नागरिकांचा COVID मुळे मृत्यू)

शहरातील लॉकडाऊन संपवण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. ग्वांगझूमधील व्हिडिओ फुटेजमध्ये लोक पोलिसांची वाहने उलटताना दिसत आहेत. आंदोलकांनी कोविड नियंत्रणासाठी लावलेला अडथळा तोडला. विशेष म्हणजे, कोरोना महामारीचा प्रसार झाल्यानंतर ग्वांगझूमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेत घसरण दिसून येत आहे. शून्य कोविड धोरणाबाबत चीनमध्ये खूप दबाव आहे. कोरोना निर्बंधांमुळे ग्वांगजू शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. येथे लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे तेथे मोठ्या संख्येने परप्रांतीय मजूर राहतात. (हेही वाचा-  Disease-X: कोरोनानंतर आता डिजीज X रोगाचा धोका! WHO ने व्यक्त केली चिंता)

निर्बंधांमुळे सामान्य जनता त्रस्त -

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कोरोना नियंत्रणासाठी उचललेल्या पावलांमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे चीनमध्येही कोरोनाबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कोरोना संसर्गाची आकडेवारी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे वृत्त आहे. चीनमधील लोकांनी कोरोनाच्या औषधांचा साठा करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे या शहरात सर्वसामान्यांच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.