सुदानमध्ये (Sudan) गेल्या सात दिवसांपासून हिंसक संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात , आतापर्यंत 200 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 2000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भारतातील अनेक लोक सुदानमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे, युरोपियन युनियनच्या राजदूतावरही हल्ला झाला आहे. जगभरातील देश आणि संघटनांकडून हा हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. सुदानची राजधानी खार्तूममधील हजारो भारतीयांचे जीव धोक्यात आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे.सुदानमध्ये सध्या 4,000 भारतीय अडकले आहेत. सुदानमधील भारतीयांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.
सुदानमध्ये गेल्या सात दिवसांपासून देशाचे सैन्य आणि निमलष्करी गट यांच्यात लढाई सुरू आहे ज्यात सुमारे 200 लोक मरण पावले आहेत. सततच्या गोळीबारामुळे भारतीयांना अन्न, पाणी, औषधे आणि विजेचीही टंचाई जाणवत आहे. सुमारे 5 कोटी लोक वीज, अन्न आणि पाण्यापासून वंचित आहे.दळणवळण व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सरकार सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सतत संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री (EAM) एस जयशंकर यांनी सांगितले.
हिंसाचारग्रस्त सुदानमध्ये भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यूएस, यूके आणि सौदी अरेबियासह परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर संपर्कात आहे. दरम्यान सुदानमध्ये काम करणाऱ्या एका भारतीयाला 16 तारखेला गोळी लागली होती. त्यात तो जखमी झाला होता. त्याचे निधन झाले आहे.