Sheikh Hasina (फोटो सौजन्य - X/@saifahmed75)

Sheikh Hasina Faces Genocide Crime: बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना (Sheikh Hasina) यांना ढाका सोडून जावे लागले. आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र त्यानंतरही शेख हसीना यांचा त्रास कमी होत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणात (International Crimes Tribunal- ICT) शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी वृत्तसंस्था बीएसएसच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि मानवतेविरुद्ध गुन्हे केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी केली आहे, ज्यांच्या मुलाचा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला होता.

अहवालानुसार, 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इयत्ता 9वीचा विद्यार्थी आरिफ अहमद सियामचा मृत्यू झाला होता. त्याचे वडील बुलबुल कबीर यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिलामार्फत खटला दाखल केला आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनलचे उपसंचालक अताउर रहमान यांनी डेली स्टारला सांगितले की, तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर, ते पुढील कार्यवाहीसाठी ट्रिब्युनलच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाकडे अहवाल सादर करतील. शेख हसीना आणि अनेक लोकांवर नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप असल्याचे वृत्त संस्थेने दिले आहे. (हेही वाचा: Bangladesh Protest: बांगलादेशात विद्यार्थ्यांकडून सुप्रीम कोर्टाला घेराव; सरन्यायाधीशांचा राजीनामा)

तक्रारीत शेख हसीना आणि इतरांवर 15 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान सामूहिक हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना सरकार पडल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बांगलादेशात 230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेल्या तीन आठवड्यांच्या हिंसाचारात मृतांची संख्या 560 वर पोहोचली आहे. या गदारोळानंतर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आणि ते सध्या भारतात आश्रय घेत आहेत.