जगभरातील अनेक देशांमध्ये मुस्लीम मुलींच्या कपड्यांवर अनेक निर्बंध आहेत. इराणमध्ये तर याबाबत मोठे आंदोलन सुरु आहे. अशात हिजाबबाबत (Hijab) इंडोनेशियामधून (Indonesia) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडोनेशियन शाळेत चुकीच्या पद्धतीने हिजाब परिधान केलेल्या 14 विद्यार्थिनींचे मुंडन केले आहे.
या प्रकरणी शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, प्रशासनाने या घटनेबद्दल माफीही मागितली आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, इंडोनेशियातील पुराणमतवादी भागात मुस्लिम आणि बिगर मुस्लिम मुलींना वर्षानुवर्षे हिजाब घालण्याची सक्ती केली जात आहे.
अहवालानुसार, गेल्या बुधवारी, इंडोनेशियातील पूर्व जावा, लॅमोंगन सिटी येथील सरकारी कनिष्ठ हायस्कूल SMPN 1 मध्ये अज्ञात शिक्षकाने 14 मुस्लिम मुलींचे अंशतः मुंडण केले, कारण या मुलींनी त्यांचा हिजाब व्यवस्थित घातला नव्हता. हे प्रकरण समोर आल्यानंतर मोठा गदारोळ माजला. आता या शिक्षकाला निलंबित करण्यात आले असून शाळेच्या वतीने खेदही व्यक्त करण्यात आला आहे.
(हेही वाचा: Miss World 2023: यंदाची 71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा रंगणार कश्मीरच्या खोर्यात)
माहितीनुसार, या शाळकरी मुलींनी त्यांच्या हिजाबखाली टोपी घातली नव्हती. मात्र शाळेने मुलींना हिजाबच्या आधी डोक्यावर टोपी घालण्याचा सल्ला दिला आहे. यासह शाळेने मुलींच्या पालकांची माफी मागितली आहे. इंडोनेशियातील मानव अधिकारांशी संबंधित आंद्रियास हर्सनो म्हणाले, 'लॅमोंगन प्रकरण हे इंडोनेशियातील आतापर्यंतचे सर्वात भयावह प्रकरण आहे. विद्यार्थिनींचे केस कापण्यासाठी आजवर एकाही शिक्षकाला मंजुरी मिळालेली नाही. लॅमोंगनच्या शिक्षण कार्यालयाने या शिक्षकावर कडक कारवाई करावी आणि झालेल्या आघातांना तोंड देण्यासाठी पीडितांसाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करावी.' याआधी 2021 मध्ये पश्चिम सुमात्रा येथील एका ख्रिश्चन विद्यार्थिनीवर हिजाब घालण्यासाठी दबाव आणल्यानंतर हेडस्कार्फचा मुद्दा चर्चेत आला होता.