मंकीपॉक्स/प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Twitter)

Monkeypox Outbreak: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 11 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या 80 प्रकरणांची पुष्टी केली आहे. WHO या नवीन आजारावर संशोधन करत आहे. गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, हा विषाणू स्थानिक आहे, जो काही देशांतील प्राण्यांमध्ये आहे. यामुळे हा संसर्ग स्थानिक पर्यटक आणि लोकांमध्येच पसरतो.

तथापि, शुक्रवारी भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि आयसीएमआरला परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आणि बंदर आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक पातळीवरील महामारी पूर्णपणे संपण्याची शक्यता नाही. परंतु हा संसर्ग फारसा पसरत नाही. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीत लोकांना कायमस्वरूपी त्याच संसर्गासह जगावे लागते. (हेही वाचा - Monkeypox Virus: जगभरात वेगाने पसरत आहे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग; कारणे आणि लक्षणे जाणून घ्या)

1958 मध्ये सापडले होते पहिले प्रकरण -

मंकीपॉक्स पहिल्यांदा 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये आढळून आला. 1970 मध्ये प्रथम मानवांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली. व्हायरसचे दोन मुख्य प्रकार पश्चिम आफ्रिकन आणि मध्य आफ्रिकन आहेत. यूकेमध्ये सापडलेल्या संक्रमित रुग्णांपैकी दोन जणांनी नायजेरियातून प्रवास केला होता. त्यामुळे हा पश्चिम आफ्रिकेचा स्ट्रेन असू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप त्याची पुष्टी झालेली नाही. मंकीपॉक्‍स हा स्मॉलपॉक्‍स व्हायरस कुटुंबातील आहे.

मंकीपॉक्सची लक्षणे -

मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर, रुग्णाला ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती ही लक्षणे दिसतात. तापाच्या वेळी अत्यंत खाज सुटणारी पुरळ उठू शकते, जी अनेकदा चेहऱ्यावर सुरू होते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरते. संसर्ग साधारणपणे 14 ते 21 दिवस टिकतो. मंकीपॉक्स विषाणू त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. हे संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव यांना स्पर्श करून प्रसारित होऊ शकतो. संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्याने देखील मंकीपॉक्स होऊ शकतो.