Pulwama Terror Attack: सहा महिन्यांपूर्वी कराची येथे रचला हल्ल्याचा कट; दहशतवादी हाफिज सईद याने दिली होती धमकी
Pulwama Terror Attack / File Photo | (Photo Credits: ANI)

Pulwama Terror Attack: पुलवामा (Pulwama) येथे जैश-ए-मोहम्मद ( Jaish E Mohammed) या दहशतवादी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. असा हल्ला करण्याची दहशतवाद्यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही दहशतवादी संघटनांनी भारतात असे अनेक घातपात घडवून आणले आहेत. त्यामुळे दहशतवादी कारवायांना पाठबळ देणाऱ्या आणि दहशतवादी संघटनांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला (Pakistan) धडा शिकवा अशी मागणी सर्वस्तरातून व्यक्त होते आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेला घातपात हासुद्धा एक कटच होता. पाकिस्तानमध्ये हा कट सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आला होता. तसेच, भारतात घातपाती कारवाया करण्याची धमकीही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली होती, अशी माहिती पुढे येत आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला करण्यापूर्वी जैश-ए-मोहम्मदने पाकिस्तानमध्ये रॅलीचे आयोजिन केले होते. ही रॅली गेल्या 5 फेब्रुवारीला पाकिस्तानची राजधानी कराची या शहर काढण्यात आली होती. भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद (Hafiz Muhammad Saeed) याने अफजल गुरु याच्या नावाने आत्मघातकी गट (Suicide Squad) तयार करण्यात येत असल्याची भाषा या रॅलीत भाषण करताना केली होती. त्याने याच रॅलीमध्ये म्हटले होते की, जैश-ए-मोहम्मद संघटनेने असे ७ गट भारतात पाठवले आहेत. दरम्यान, सईदने भारताला धमकी देत काश्मीर सोडून जा अन्यथा बरेच काही गमवावे लागेल, अशी धमकीही दिली होती. या धमकीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला झाला. ज्यात 37 जवान शहीद झाले.

दरम्यान, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा कट जैश-ए-मोहम्मद या संघटनेने पाकिस्तानातील कराची येथे 6 महिन्यांपूर्वीच रचला होता. या पार्श्वभूमिवर गुप्तचर संघटनांनी डिसेंबरमध्येच हाय अलर्ट जारी केला होता की, दहशतवादी आदिल अहमत डार उर्फ विकास कमांडो काश्मिरमध्ये घुसला आहे. जैशने आदिल याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये आईईडी हल्ल्याचे प्रशिक्षण दिले होते. त्याला अब्दुल रशीद गाजी (गाझी) या दहशतवाद्याने प्रशिक्षण दिले होते. अब्दुल रशीद गाजी याने अफगानिस्तान येथील तालिबानी दहशतवाद्यांसोबतही काम केले ओहे.(हेही वाचा, Pulwama Terror Attack: 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान देशाचं संरक्षण करण्यात अपयशी- शरद पवार)

जैशच्या प्रवक्त्याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओत त्याने आदिल अहमद डार याला आईईडी हल्ल्याचे प्रशिक्षण दिल्याचे म्हटले आहे. मुळचा काकपोरा येथील राहणारा आदिल अहमद डार उर्फ विकास कमांडो हा 2018 मध्ये जैश-ए-मोहम्मद या संघटनेत सहभागी झाला होता.