
South Asian Athletics Championships Postponed: दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा (South Asian Athletics Championship) पुढे ढकलण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 28 पर्यटकांना ठार मारले. या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे जूनमध्ये होणारी स्पर्धा आता पुढे ढकलण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यामुळे आता या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावरही बंदी घालण्याचीही शक्यता आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, ही स्पर्धा जूनमध्ये होणार होती. भूतानी खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधीच रांचीला पोहोचले होते आणि त्यांनी सरावही सुरू केला होता. तथापि, स्पर्धेच्या तारखेत आता बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही स्पर्धा 3 ते 5 मे दरम्यान खेळवली जाणार होती. परंतू नंतर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळण्यास विलंब झाल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी येऊ शकते
दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी येऊ शकते. पहलगाममधील हल्ल्यानंतर, भारतात येण्यासाठी पाकिस्तानने दिलेले सर्व व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानने एकूण 43 खेळाडू पाठवले होते. ज्यात भालाफेकपटू अर्शद नदीमचे नाव देखील समाविष्ट होते.