Plasma Jet: सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूचं (Coronavirus) संक्रमण वाढलं आहे. तसेच दुसरीकडे जगभरात शास्त्रज्ञ कोरोनावरील लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील एका संशोधनात प्लाझ्मा जेट (Plasma Jet) 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात कोरोना विषाणूचा नाश करू शकतो, असं समोर आलं आहे. संशोधकांनी 3 डी प्रिंटरपासून प्रेशर प्लाझ्मा जेटचे एक स्प्रे तयार केले आहे, जे कोरोना विषाणू मारण्यास यशस्वी ठरले आहे. या संशोधनानंतर, कोरोनाविरूद्धच्या लढाईत जेट प्लाझ्मा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, अशी आशा शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की, प्लाझ्मा जेट्स 30 सेकंदांपेक्षा कमी कालावधीत धातू, लेदर आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर कोरोना विषाणू नष्ट करू शकतात. हे संशोधन कोरोनाविरूद्ध लढल्या जाणार्या युद्धातील महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.
कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी संशोधकांनी थ्री-डी प्रिंटर प्रेशर प्लाझ्मा जेट चा स्प्रे तयार केला आहे. जेव्हा हा स्प्रे प्लास्टिक, धातू, कार्ड बोर्ड आणि लेदर (बास्केटबॉल, फुटबॉल आणि बेसबॉल) इत्यादींच्या पृष्ठभागावर वापरला गेला तेव्हा असे दिसून आले की, या स्प्रेने पृष्ठभागावरील कोरोना विषाणू तीन मिनिटांपेक्षा कमी वेळात नष्ट केले. त्यापैकी बहुतेक विषाणू मारण्यास 30 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागला. (हेही वाचा - Covid-19 Vaccine Update: Sputnik V लस कोरोना व्हायरस वर 92% परिणामकारक; रशियाचा दावा)
याशिवाय जेव्हा हा स्प्रे तोंडाला लावलेल्या मास्कवर वापरला गेला तेव्हा हा स्प्रे मास्कवरदेखील समान कार्य करत असल्याचं आढळलं. फिजिक्स ऑफ फ्लुइड्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात असे स्पष्ट केले आहे की, प्लाझ्मा जेट चार मूलभूत अवस्थामध्ये तयार करण्यात आला आहे. हा स्प्रे स्थिर गॅस गरम करून किंवा विद्युत चुंबकीय क्षेत्राशी संपर्क साधून बनवता येतो.
दरम्यान, हे संशोधन जूनमध्ये करण्यात आले होते. ज्यामध्ये धातू, चामडे आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर उपस्थित कोरोना विषाणूसारख्या व्हायरसवर संशोधन करण्यात आले. या संशोधनात असे आढळले आहे की, कोल्ड प्लाझ्मामुळे 30 सेकंदांपेक्षा कमी वेळात कोरोना विषाणूचा नाश होतो.