Pakistan PM Imran Khan | (Photo Credits: Facebook)

पाकिस्तानमध्ये (Pakistan) राजकीय आणि आर्थिक संकट असताना पेट्रोल दरात 30 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये आता जनतेला पेट्रोलसाठी प्रति लिटर 179.86 रुपये मोजावे लागणार आहेत, तर डिझेलसाठी 174.15 रुपये मोजावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी शेहबाज शरीफ सरकारला (Shehbaz Sharif Govt) घेरले आहे. त्यांनी पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारला असंवेदनशील म्हटलं आहे. तसेच भारत सरकारचे कौतुक केले. इम्रान खान म्हणाले की, अमेरिकेच्या सामरिक मित्र देशाने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाचे दर प्रति लिटर 25 रुपयांनी कमी केले आहेत. ते पुढे म्हणाले की, अमेरिकेचा सामरिक मित्र असलेल्या भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून इंधनाच्या किमती प्रति लिटर 25 रुपयांनी कमी केल्या आहेत. आता या बदमाशांच्या हातून आपल्या देशाला महागाईचा आणखी एक मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

पेट्रोलियम पदार्थांची किंमत किती आहे?

पेट्रोल 179.86 पाकिस्तानी रुपये, डिझेल 174.15 पाकिस्तानी रुपये, रॉकेल तेल 155.56 पाकिस्तानी रुपये आणि लाईट डिझेल 148.31 पाकिस्तानी रुपये असल्याचे वृत्त डॉन वृत्तपत्राने दिले आहे. इमरान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ करून देशातील जनता आयात केलेल्या सरकारला विदेशी मालकांच्या अधीन करण्याची किंमत मोजत आहे.

शरीफ सरकार हे असंवेदनशील सरकार 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 30 रुपयांची वाढ केल्यानंतर शाहबाज शरीफ सरकारवर टीका केली आहे. सरकारवर टीका करताना, इम्रान म्हणाले की या "संवेदनशील सरकारने" पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने रशियासोबत 30 टक्के स्वस्त तेलासाठी केलेला करार पुढे नेला नाही. (हे देखील वाचा: Afghanistan: तालिबानचे आणखी एक नवीन फर्मान; महिला टीव्ही अँकरला शोमध्ये झाकावा लागणार चेहरा)

सर्वात मोठी झालेली वाढ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, ही एकाच वेळी झालेली सर्वात मोठी वाढ आहे. अक्षम आणि संवेदनाशून्य सरकारने रशियाशी आमच्या कराराचा पाठपुरावा केला नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ता इस्माईल यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकार परिषदेत किमतींबाबत घोषणा केली, जिथे ते म्हणाले की, सरकारकडे किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल, पण देशाचे हित आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते वाचवणे आमच्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.