प्रतिकात्मक फोटो (PC - Twitter)

Afghanistan: अफगाणिस्तानचा ताबा घेणाऱ्या तालिबान (Taliban) ने गुरुवारी आणखी एक नवीन फर्मान (Taliban New Decree) जारी केले. या नवीन फरमानमध्ये म्हटले आहे की, सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिलांना शो करताना त्यांचे चेहरे झाकावे लागतील. फरमान जारी करताना तालिबानच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाने हा अंतिम निर्णय असल्याचे म्हटले आहे. टोलोन्यूजच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानातील सर्व माध्यमांना हा आदेश जारी करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या संघटनेने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यापासून अफगाण महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. तरुण मुली आणि महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. (हेही वाचा -Taliban's New Rule: महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र भोजनास मनाई, अफगानिस्तानमध्ये तालीबानचे नवे फर्मान)

तालिबानने यापूर्वी त्यांच्या अधिकृत आदेशात अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र सहाय्यता मिशन (UNAAMA) च्या महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात हिजाब घालण्याचे निर्देश दिले होते. तालिबानच्या नव्या आदेशाला अनेक महिलांनी विरोधही केला होता.

अफगाणिस्तानातील यूएन मिशनने तालिबानच्या आदेशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे महिला आणि मुलींसह सर्व अफगाण लोकांच्या मानवी हक्कांच्या सन्मान आणि संरक्षणाबाबत अनेक आश्वासने मोडली आहेत. तालिबानने इशारा दिला की, जर महिलांनी आदेशाचे उल्लंघन केले तर त्यांच्या पालकांना शिक्षा आणि तुरुंगात टाकले जाईल.