Taliban's New Rule: महिला-पुरुष, पती पत्नींना हॉटेलमध्ये एकत्र भोजनास मनाई, अफगानिस्तानमध्ये तालीबानचे नवे फर्मान
Representative Image (Credits: Wikimedia Commons)

अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान (Taliban) दररोज नवनवे फर्मान काढून विचित्र नियम (Taliban's New Rule in Afghanistan) लागू करत आहे. आता तर तालिबानने विचीत्रच फर्मान काढले आहे. समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरताना तालिबानने लैंगिक विभाजनाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता कोणत्याही स्त्री पुरुषाला हॉटेलमध्ये एकत्र भोजन घेता येणार नाही. धक्कादायक म्हणजे हे जोडपे पती-पत्नी असले तरीही नाही. अफगानमधील वृत्तसंस्था आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. तालिबानच्या या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार पडसाद उमटू लागले आहेत.

हेरात प्रांतातील सूत्रांचा हवाला देऊन खाम प्रेसने वृत्त दिले आहे की, पुरुषांना कौटुंबिक रेस्टॉरंटमध्ये कुटुंबातील सदस्यांसह (महिला) एकत्र जेवण्याची परवानगी नाही. अफगाण वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सद्गुणांचा प्रचार आणि दुर्गुणांचा प्रतिबंध मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार " संबंधित महिला पुरुष हे जरी ते पती-पत्नी असले तरीही" त्यांना हे नियम लागू होतात. ते भोजनास एकत्र बसू शकत नाहीत. एका अफगाण महिलेने खुलासा केला की हेरात रेस्टॉरंटच्या व्यवस्थापकाने तिला तिच्या पतीपासून वेगळे बसण्यास सांगितले. (हेही वाचा, All About Taliban: तालिबान काय आहे? तालिबानी संघटन, स्थापना, ओसामा बीन लादेनची एण्ट्री आणि अफगान जनतेची फरफट)

सद्गुण आणि दुर्गुण प्रतिबंधक मंत्रालयातील एक तालिबान अधिकारी रियाज उल्लाह सीरात म्हणाले की, मंत्रालयाने एक निर्देश जारी केला आहे ज्यामध्ये हेरातच्या सार्वजनिक उपक्रमांना लैंगिक विभाजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी उदा. हॉटेलमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांना केवळ स्वतंत्र दिवशीच (वेगवेगळ्या) संबंधित ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी अधिकृत परवानगी असेल. ज्या महिलांना उद्यानांमध्ये जायचे असेल त्या केवळ गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारीच जाऊ शकतात. इतर दिवशी पुरुषच उद्यानामध्ये जाऊ शकतात. जेणेकरुन ते रिकाम्या वेळात फिरतील आणि व्यायामही करतील.