
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चहूबाजूंनी टीका व्हायला सुरुवात झाली. दहशतवादी संघटनांना थारा देणारा पाकिस्तान जगात चेष्टेचा विषय बनला. स्वतःच्या देशाच्या विकासाऐवजी शेजारील राष्ट्रावर हल्ले करण्यात धन्यता मानणाऱ्या पाकिस्तानची वाटचाल दारिद्र्यतेकडे होत असलेली दिसून येत आहे. उद्योगांना पोषक असे वातावरण पाकिस्तानमध्ये नाही. शिक्षणाचा अभाव, सामाजिकदृष्ट्या मागासलेला समाज, वाढती बेरोजगारी, दहशतवाद्यांची वाढती संख्या यांमुळे गेल्या 70 वर्षांत पाकिस्तानचा विकास झालाच नाही. आता परदेशातून आयात करण्यासाठी पाकिस्तानकडे फक्त 60 दिवस पुरतील एवढेच चलन शिक्कल असल्याची माहिती मिळत आहे. होय सध्या पाकिस्तानच्या तिजोरीत साधारण साढे आठ हजार कोटी रुपयेच शिल्लक आहेत. म्हणजेच यावर काही उपाययोजना केली नाही तर 2 महिन्यांमध्ये पाकिस्तान कंगाल होऊ शकतो.
नुकतीच सौदीच्या राजकुमाराने पाकिस्तानला भेट दिली, पाकिस्तानच्या अशा परिस्थितीमुळे सौदीकडून पाकिस्तानला 20 बिलीयन डॉलरची मदत करण्यात आली आहे (एकट्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 48.9 बिलीयन डॉलर इतकी आहे). मात्र पाकिस्तानवर आधीच 28 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. यातील सर्वात जास्त कर्ज चीनने पाकिस्तानला दिले आहे (जवळजवळ 13,500 कोटी). पाकिस्तानने चीनकडून जे कर्ज घेतले आहे त्याचे व्याज चुकते करणेही पाकिस्तानला जमले नाही. त्यामुळे पाकिस्तान अजून कर्ज घेत गेला यामुळे ही कर्जाची रक्कम वाढत गेली. पाकिस्तानच्या अशा परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पाकिस्तानी रुपयाचे मूल्य कमालीचे घसरून, एका डॉलरची किंमत 140 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे.
आतंकवाद्यांचा समूळ नाश करण्यासाठी अमेरिकेने वेळोवेळी पाकिस्तानची मदत केली आहे. मात्र 9/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2100 कोटी रुपयांची मदत थांबवली. मात्र गेल्या 15 वर्षांमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला 33 अब्ज डॉलरची मदत केली आहे. (हेही वाचा: पाकिस्तान म्हणतो आम्ही आर्थिक संकटातून सावरतोय, गव्हर्नर तारिक बाजवा यांचा दावा)
नुकतेच पाकिस्तानने कर्ज मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी (IMF)चे दरवाजे ठोठावले होते. आयएमएफ गरीब राष्ट्रांना कमी व्याजदरात कर्ज देते. मात्र आता आयएमएफसुद्धा पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी उत्सुक नसलेले दिसून येत आहे. या सर्व बाबी पाहता आता सौदीने केलेल्या मदतीचा पाकिस्तान कसा फायदा करून घेतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.