Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

दिवसेंदिवस पाकिस्तानची (Pakistan) आर्थिक परिस्थिती खराब होत चालली आहे. देशात अनेक गोष्टींच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत, ज्यामुळे लोकांना जगणे मुश्कील होत आहे. म्हणूनच ज्यांना संधी मिळत आहे ते पाकिस्तानमधून पळ काढत आहेत. आता पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे दोन वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट कॅनडात फरार झाले आहेत. पाकिस्तानच्या सरकारने सोमवारी पुष्टी केली की, पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सचे आणखी दोन क्रू सदस्य कॅनडात विमान उतरल्यानंतर पळून गेले.

इस्लामाबादहून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे फ्लाइट कॅनडाच्या टोरंटोमध्ये उतरले व त्यानंतर दोन वरिष्ठ क्रू सदस्य लगेचच पळून गेले, असे पाकिस्तानी एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या म्हणण्यानुसार, या क्रू मेंबर्सच्या पलायनामुळे, यावर्षी कॅनडाला पोहोचल्यानंतर पळून गेलेल्या पाकिस्तानी एअरलाइन्सच्या क्रू मेंबर्सची संख्या चार झाली आहे. अशाप्रकारे गेल्या वर्षीही पीआयएचे चार क्रू मेंबर्स फरार झाले होते. (हेही वाचा: Hamas Lost Control In Gaza: हमासने गमावले गाझारील नियंत्रण; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा दावा)

पीआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, खालिद महमूद आणि फैदा हुसैन असे दोन वरिष्ठ फ्लाइट अटेंडंट, पीआयए फ्लाइट पीके772 घेऊन इस्लामाबादहून कॅनडाला आले होते. ते टोरंटोला पोहोचल्यानंतर परत पाकिस्तानला येण्याऐवजी तिथेच पळून गेले. प्रवक्त्याने सांगितले की, ‘इस्लामाबादला परतण्याच्या नियोजित वेळी, दोन वरिष्ठ क्रू मेंबर्स फ्लाइटमध्ये परतले नाहीत. त्यामुळे पाकिस्तान एअरलाइन्सला दोन फ्लाइट अटेंडंटशिवाय इस्लामाबादला परतावे लागले. टोरंटोमधील स्थानिक अधिकाऱ्यांना पीआयएच्या दोन कर्मचार्‍यांची माहिती देण्यात आली आहे. चौकशीनंतर या दोघांविरुद्ध कठोर विभागीय कारवाई सुरू केली जाईल आणि त्यांची सेवा समाप्त केली जाईल.

दरम्यान, पाकिस्तानी एअरलाइन्स गंभीर आर्थिक संकटात सापडली असून गेल्या महिन्यात त्यांची शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली होती. विमान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाहीत, त्यामुळे डझनभर कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे, तर शेकडो कर्मचाऱ्यांची कंपनीवर लाखो रुपयांची थकबाकी आहे.