Coronavirus (Photo Credits: Pixabay)

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे आतापर्यंत कमीतकमी 306,377 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे 4,593,434 रुग्ण असल्याची पुष्टी केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देश या विषाणूवर लस (Vaccine) अथवा औषध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील (Oxford University) संशोधकांनी कोविड-19 च्या उपचारांसाठी लसीची तपासणी सहा माकडांवर केली आहे. यातील दिलासादायक बाब म्हणजे, या चाचणीचे निकाल सकारात्मक आले आहेत. त्यानंतर आता या लसीची चाचणी मानवांवर देखील केली जात आहे. सुमारे 1000 स्वयंसेवकांनी या क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेतला आहे.

ChAdOx1 nCoV-19 नावाच्या या लसीची तपासणी 6 मकाऊ माकडांवर (Macaque Monkeys) केली गेली. मानव व माकडांमधील रोगप्रतिकारक शक्ती समान असल्याने, या माकडांच्या चाचण्यांद्वारे ही लस मानवांवर कसा परिणाम करेल हे जाणून घेण्यास सक्षम असेल. मात्र मानवांमध्ये त्याचे परिणाम इतके चांगले येतील याची शाश्वती नाही. याबाबत बोलताना संशोधकांनी सांगितले की, कोविड-19 चा संसर्ग झालेल्या माकडांना दोन गटात विभागले गेले होते. या दरम्यान ज्यांना ही लस देण्यात आली, त्यांची प्रकृती इतरांपेक्षा चांगली होती. 14 दिवसांच्या आत त्यांच्यात Antibody तयार होऊ लागल्या. यावरून हे उघड झाले की 'CHADOX 1 NCOV-19' चा मकाऊ माकडांवर चांगला परिणाम झाला.

बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था (एनआयएच) आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने अमेरिकेत ही चाचणी घेतली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मानवावरही या लसची चाचणी सुरू केली आहे. ही चाचणी तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील निकाल सकारात्मक आल्यावर पुढील चाचणी सुरू केली जाईल.