(प्रतिनिधिक छायाचित्र ) Photo credits Pixabay

नायजेरियाच्या (Nigeria) वायव्य भागातील कॅटसिना (Katsina) राज्यातील एका माध्यमिक विद्यालयावर बंदूकधार्‍यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर शेकडो नायजेरियन विद्यार्थी बेपत्ता आहेत. कॅटसिना राज्य पोलिस प्रवक्ते गॅम्बोआ ईसाह म्हणाले की, 400 पेक्षा जास्त विद्यार्थी शाळेतून बेपत्ता आहेत. शुक्रवारी रात्री कांकरा येथील शासकीय विज्ञान माध्यमिक विद्यालयावर सशस्त्र हल्लेखोरांनी एके 47 रायफलने हल्ला केला. इसाने सांगितले की पोलिसांनी हल्लेखोरांना चकमकीत अडकवून ठेवले, या दरम्यान या विद्यार्थ्यांना शाळेचे कुंपण ओलांडून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याची संधी मिळाली. 600 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थ्यां सुरक्षित आहेत परंतु अजूनही 400 विद्यार्थी बेपत्ता आहेत.

पोलिस प्रवक्ते गॅम्बोआ इसाह पुढे म्हणाले की, बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या किती आहे हे शोधण्यासाठी पोलिस, नायजेरियन आर्मी आणि नायजेरियन एअर फोर्स शालेय अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहेत. बेपत्ता विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी किंवा त्यांची सुटका करण्यासाठी तपास पथके कार्यरत आहेत. या भागातील स्थानिक रहिवासी मन्सूर बेलो यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की हल्लेखोरांनी या हल्ल्यात काही विद्यार्थ्यांना आपल्यासोबत घेतले आहे.

नायजेरियात बंदूकधार्‍यांनी शाळेत केलेला हा ताजा हल्ला आहे, परंतु अशा घटना यापूर्वीही तेथे घडल्या आहेत. शाळेवरील हल्ल्याची सर्वात गंभीर घटना आणि विद्यार्थ्यांचे अपहरण एप्रिल 2014 मध्ये घडले होते. त्यावेळी, बोको हराम या जिहादी गटाच्या सदस्यांनी ईशान्य बोर्नो राज्यातील चिबोक येथील शाळा वसतिगृहातून 276 मुलींचे अपहरण केले होते. या घटनेत अपहरण झालेल्या मुलींपैकी 100 मुली अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा: पत्रकारिता करण्यासाठी पाकिस्तान सर्वात धोकादायक देश; 1990 पासून 138 Journalists ची हत्या- Report)

हा ताजा हल्ला पश्चिमोत्तर नायजेरियात सक्रिय डाकुंच्या अनेक गटांपैकी एकाने केला असल्याचे समजते. खंडणीसाठी लोकांचे अपहरण करण्याबाबत हे गट कुख्यात आहेत.