
कोरोना विषाणू अद्याप पूर्णपणे संपलेला नाही अशात मंकीपॉक्सने (Monkeypox) जगात दहशत माजवायला सुरुवात केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची रोज नव नवीन प्रकरणे समोर येत आहेत. सध्या हा आजार जगातील 20 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटले आहे की, मंकीपॉक्स विषाणूच्या 20 पेक्षा जास्त देशांमध्ये 200 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त संशयित प्रकरणे आढळली आहे.
या आजाराचा वेगाने होत असलेला प्रसार पाहता जागतिक आरोग्य संस्थेने राष्ट्रांना संसर्गजन्य रोगावर पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे. डब्ल्यूएचओच्या कोविड-19 तांत्रिक आघाडीच्या मारिया व्हॅन केरखोव्हच्या मते, येत्या काही दिवसांत अजून काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.’ आजारी व्यक्तीशी शारीरिक संपर्क आल्यास त्याचा प्रसार होऊ शकतो. दरम्यान, हा आजार शास्त्रज्ञांनी 1958 मध्ये पहिल्यांदा शोधला होता. मानवांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे पहिले प्रकरण 1970 मध्ये नोंदवले गेले.
यूकेमध्ये 7 मे रोजी पहिले प्रकरण समोर आल्यानंतर आता मंकीपॉक्सचा प्रसार अलिकडच्या आठवड्यात उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये झाला आहे. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे बहुतेक रुग्ण काही आठवड्यांत बरे होत आहेत व आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद नाही. युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोलनुसार, युरोपियन युनियन (EU) ने मंकीपॉक्सच्या 118 प्रकरणांची पुष्टी केली आहे. स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अनुक्रमे 51 आणि 37 प्रकरणांसह युरोपियन युनियनमध्ये सर्वात मोठा उद्रेक नोंदवला गेला आहे. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने व्हायरसच्या 90 प्रकरणांची पुष्टी केली आहे. (हेही वाचा: Germany मध्ये Bharat Biotech ची कोविड 19 लस Covaxin ला मंजुरी)
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार देशातील सात राज्यांमध्ये नऊ प्रकरणे समोर आली आहेत, तर कॅनडाच्या आरोग्य अधिकार्यांनी मंकीपॉक्सच्या 16 प्रकरणांची पुष्टी केली आहे, हे सर्व क्विबेक प्रांतात आहेत. या देशांतील आरोग्य अधिकार्यांनी म्हटले आहे की बहुतेक रुग्ण हे समलिंगी किंवा बायसेक्शुअल पुरुष आहेत. काही अधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे की, मंकीपॉक्स हा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार नाही.