Lockdown in China: चीनच्या Shanghai शहरात दोन वर्षांनंतर सर्वात मोठा लॉकडाऊन; नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

चीन (China) गेल्या दोन वर्षातील सर्वात भीषण कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीचा सामना करत आहे. कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढल्यानंतर आता चीनचे आर्थिक केंद्र समजल्या जाणाऱ्या शांघायमध्ये (Shanghai) लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या शहरातील लॉकडाऊनमुळे अडीच कोटींहून अधिक लोक त्यांच्या घरात बंदिस्त झाले आहेत. या लॉकडाऊननंतर शहरातील रस्ते आणि बाजारपेठा पूर्णपणे सुनसान झाल्या आहेत. येथे पुन्हा एकदा तेच वातावरण पाहायला मिळत आहे जे कोरोना महामारीच्या पहिल्या वर्षी होते. कोरोना महामारीच्या काळात शहरासाठी उचललेले हे सर्वात मोठे पाऊल आहे.

चीनमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी हा कडक लॉकडाऊन अशा वेळी लागू करण्यात आला आहे जेव्हा जग आता या महामारीसोबत जगायला शिकले आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराबाबत चीनला जेवढी चिंता आहे, तेवढी आता जगात दहशत राहिली नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी चीनने शांघाय शहरात लॉकडाऊन लागू केला आहे, मात्र ड्रॅगनच्या या निर्णयामुळे जगाचे टेंशन वाढले आहे.

स्थानिक सरकारने सांगितले की पुडोंग आणि त्याच्या आसपासच्या भागात सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुडोंग हा एक महत्वाचा आर्थिक जिल्हा आहे. शांघायमधील या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शहराचे विभाजन करणाऱ्या हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन दिसेल.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरातच राहावे लागणार आहे. बाहेरील संपर्क पूर्णतः बंद करण्यासाठी वितरित केलेली कोणतीही वस्तू किंवा गोष्ट चेकपॉईंटवर सोडल्या जातील. लॉकडाऊन दरम्यान, अत्यावश्यक व्यवसाय वगळता सर्व व्यावसायिक आस्थापने बंद राहतील आणि सार्वजनिक वाहतूक देखील बंद राहील. शांघायमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वीही चीनने कोविड-19 वर इतर देशांच्या तुलनेत लवकर नियंत्रण मिळवले होते. चीनमध्ये 'झिरो कोविड पॉलिसी' पाळली जात आहे. (हेही वाचा: चीनमध्ये संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ, एका वर्षानंतर दोन लोकांचा मृत्यु)

सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि महागाई गगनाला भिडत आहे. अशात चीनच्या कडक लॉकडाऊन धोरणामुळे जगाची अर्थव्यवस्था आणि आर्थिक बाजारपेठा अडचणीत आल्या आहेत. या लॉकडाऊनमुळे तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चीन हा प्रमुख तेल आयातदार आहे आणि दररोज 11 दशलक्ष बॅरल तेल खरेदी करतो.