कौतुकास्पद! भारतीय वंशाचे श्रीनिवासन यांची अमेरिकेतील 'फेडरल सर्किट न्यायालया'च्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती
Judge Sri Srinivasan ({PC - getty)

भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्री श्रीनिवासन (Judge Sri Srinivasan) यांनी भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. श्रीनिवासन यांची अमेरिकेतील 'फेडरल सर्किट न्यायालया'च्या (Federal Circuit Court) मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालय हे तेथील सर्वोच्च न्यायालयाखालोखाल महत्त्वाचे न्यायालय आहे. या पदावर कार्यरत असणारे 52 वर्षीय श्रीनिवासन हे दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी श्रीनिवासन यांनी अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राअध्यक्ष बराक ओबामा यांनी मे 2013 मध्ये श्री श्रीनिवासन यांची डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किटच्या युनायटेड स्टेट्स कोर्ट ऑफ अपील्सचे (फेडरल सर्किट न्यायालय) न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी या न्यायालयात नियुक्ती झालेले ते पहिले भारतीय-अमेरिकी ठरले होते. विशेष म्हणजे श्रीनिवासन हे बराक ओबामाचे आवडते न्यायाधीश आहेत. (हेही वाचा - Germany Mass Shooting: हनाऊ शहरात दोन बारमध्ये बेधुंद गोळीबारात 8 ठार, 5 गंभीर जखमी)

चंदिगडमध्ये जन्मलेल्या श्रीनिवासन यांचे मूळ गाव तामिळनाडूमध्ये आहे. श्रीनिवासन यांचे वडील 1970 मध्ये अमेरिकेच्या कन्सास शहरातील लॉरेन्स येथे स्थायिक झाले. त्यामुळे श्रीनिवासन यांचे संपूर्ण बालपण अमेरिकेतचं गेले. श्रीनिवासन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बी. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून जे. डी. पदवी मिळवली. त्यानंतर स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतले. श्रीनिवासन यांनी न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरूवात केली होती.