(Representational Image/ Photo: Twitter @ahmedjnena2)

अमेरिका आणि इराणमधील वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. इराणने अमेरिकेला प्रतिउत्तर म्हणून इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी हवाई तळावर हल्ला केला आहे. इराणने अमेरिकेच्या अल असद या लष्करी तळांवर 12 क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराण कमांडर कासिम सुलेमानी  (Kasim Sulemani) याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या वृत्ताला अमेरिकेनेही दुजोरा दिला आहे.

मागील आठवड्यात अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कमांडर सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणने अमेरिकेला इशारा दिला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांना प्रतिउत्तर म्हणून हल्ले चढवत आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावासावर हल्ला केला होता. त्यानंतर आज इराणने पुन्हा एकदा अमेरिकेच्या लष्करी तळावर तब्बल 12 क्षेपणास्त्रे डागले आहेत. (हेही वाचा - इराण लष्करातील कंमाडर कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; 35 जणांचा मृत्यू तर, 48 जण जखमी)

या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. परंतु, या हल्ल्यात अमेरिकेचे 30 जवानांचा मृत्यू झाला असल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेने बगदाद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात कमांडर सुलेमानी याच्या मृत्यू झाला होता. कमांडर सुलेमानी याच्या मृत्यूचा बदला घेण्यात येईल, अशी उघड चेतावनी इराणकडून देण्यात आली होती. तसेच अमेरिका स्वतःवर होणारा कोणताही हल्ला सहन करून घेणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगतिले होते.