Journalist Shirish Date: भारतीय वंशाचे पत्रकार शिरीष दाते यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला विचारला 'हा' प्रश्न; राष्ट्राध्यक्ष म्हणाले 'पुढचा प्रश्न'
Journalist Shirish Date Asks US President Donald Trump ‘Do You Regret Lying’ (Photo Credits: Guardian News YouTube)

Journalist Shirish Date: भारतीय वंशाचे पत्रकार शिरीष दाते (Journalist Shirish Date) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला (US President Donald Trump) एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून ट्रम्प अवाक झाले. गुरूवारी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढचा प्रश्न विचारा, असं म्हटलं.

प्राप्त माहितीनुसार, पुण्यात जन्म झालेल्या शिरीष दाते हे अमेरिकेतील हफिंग्टन पोस्टसाठी पत्रकारीता करतात. शिरीष दाते यांनी गुरूवारी व्हाइट हाउसमधील पार पडलेल्या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला की, 'मिस्टर प्रेसिडेंट, आपण अमेरिकन नागरिकांसोबत इतकं खोटं बोललात, त्याबद्दल आपल्या काही खेद वाटतो का?' (हेही वाचा - उत्तर प्रदेश: सीतापूर येथील मौसम देवी हिने दिला 4 बाळांना जन्म; घरासमोर बघ्यांची गर्दी)

शिरीष दाते यांच्या या प्रश्नावर ट्रम्प अगदी गरबडून गेले. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रश्न न ऐकल्यासारखे विचारले, काय सर्व? त्यावर दाते यांनी सर्व खोटं, धोका याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न विचारला. त्यावर ट्रम्प यांनी विचारले की, कोणी धोका दिला? दाते यांनी तुम्ही धोका दिला असल्याचे स्पष्ट सांगितलं. त्यानंतर ट्रम्प यांनी इतर पत्रकारांना पुढचा प्रश्न विचारण्यास सांगितले.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर शिरीष दाते यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलेल्या प्रश्नाची चर्चा रंगली आहे. याशिवाय या पत्रकार परिषदेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे दाते यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून 'मागील 5 वर्षांपासून ट्रम्प यांना हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहे,' असं म्हटलं आहे. शिरीष दाते हे मागील 30 वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे.