Thief (Image used for representational purpose) (Photo Credits: Pixabay)

चोरीच्या (Robbery) अनेक पद्धती तुम्ही ऐकल्या असतील, पण अमेरिकेत (US) एका व्यक्तीने अतिशय विचित्र पद्धतीने चोरी केली आहे. 42 वर्षीय जेसन ख्रिसमसने (Jason Christmas) बँक लुटण्यासाठी चक्क उबर कॅब (Uber Cab) बुक केली होती. इतकेच नाही तर ख्रिसमस बँकेत जाताना त्याने उबर ड्रायव्हरला बाहेरच थांबायला सांगितले, जेणेकरून तो बँक लुटून परत आल्यावर ती कॅब घेऊन परत जाऊ शकेल. आता पोलिसांनी या व्यक्तीला अटक करून कारागृहात पाठवले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिशिगनच्या साउथफील्डचा रहिवासी जेसन ख्रिसमसने उबेर कॅब बुक केली आणि हंटिंग्टन बँक गाठली. त्यानंतर त्याने ड्रायव्हरला आपण परत येईपर्यंत थांबण्यास सांगितले आणि तो बँकेच्या आत गेला. काही वेळाने ख्रिसमस बँकेतून चोरी करून बाहेर पडल्यानंतर तो त्याच कॅबमध्ये बसून लाहेर येथील आपल्या घरी गेला. या चोरीची माहिती मिळताच बँकेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घटनास्थळी पोहोचलेल्या साउथफील्ड पोलिसांना बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून कॅबची नंबर प्लेट सापडली, ज्याच्या मदतीने त्यांनी कॅब चालकाला पकडले आणि त्याची चौकशी करण्यात आली. चालकाने सांगितले की, त्याला या चोरीबद्दल काहीही माहिती नाही, तो फक्त त्याचे कर्तव्य बजावत होता. यानंतर चालकाच्या मदतीने पोलीस ख्रिसमसच्या घरी पोहोचले. (हेही वाचा: 'नवीन कार, टीव्ही-फ्रिज खरेदी करणे थांबवा'; Amazon चे संस्थापक Jeff Bezos यांची मंदीच्या शक्यतेबद्दल चेतावणी)

घरी पोहोचल्यावर पोलिसांनी ख्रिसमसला पकडून त्याची चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांना ख्रिसमसच्या अंगावर लाल रंग लागलेला आढळला. नंतर असे दिसून आले की, बँकेतून चोरीला गेलेल्या पैशांवर लाल रंग होता, जो ख्रिसमसच्या कपड्यांना लागला होता. यानंतर पोलिसांनी ख्रिसमसकडून लाल रंगाच्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी साउथफील्डचे पोलीस प्रमुख एल्विन बॅरन यांनी सांगितले की, त्यांच्या शहरात अशा प्रकारची चोरीची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, ख्रिसमसचा ड्रायव्हिंग परवाना निलंबित करण्यात आला होता, त्यामुळे तो स्वत: गाडी चालवू शकत नव्हता. त्यामुळे त्याने चोरी करण्यासाठी कॅब बुक केली. या प्रकरणात कॅब चालक निर्दोष आहे. त्याला ख्रिसमसच्या हेतूबद्दल माहिती नव्हती.