
सध्या पाकिस्तान (Pakistan) अक्षरशः गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात आता टोळ कीटक (Locust) पाकिस्तानच्या आधीच खराब अर्थव्यवस्थेला, पूर्णतः सपाट करण्याचा प्रयत्न करीत आहे. इम्रान खान सरकारकडून या टोळ कीटकांच्या सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे (Locust Attack) देशात राष्ट्रीय आणीबाणी (National Emergency) जाहीर करण्यात आली.
अहवालानुसार, पिके मोठ्या प्रमाणात नष्ट करणाऱ्या या टोळ कीटकांच्या टोळीशी सामना करण्यासाठी, शेती उत्पादनासाठी देशाचा मुख्य प्रदेश असलेल्या पंजाब प्रांतात ही आणीबाणी विशेषरित्या लागू करण्यात आली. शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चार प्रांतातील मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत इम्रान खान यांनी राष्ट्रीय कृती आराखड्यास मान्यता दिली. टोळ कीटकांच्या होणाऱ्या हल्ल्यावर मात करण्यासाठी, देशाला 730 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉनच्या अहवालानुसार, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मंत्री खुसरो बख्तियार यांनी नॅशनल असेंब्लीला, या संकटाला सामोरे जाण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. कीटक निर्मूलनासाठी राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेण्यासाठी बख्तियार यांच्या अध्यक्षतेखाली, एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे आदेश पंतप्रधान खान यांनी दिले. तसेच पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना पीक नुकसानीच्या आधारे त्यावर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा: भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला नडले; खर्च टाळण्यासाठी चहा-बिस्कीटांवर बंदी, नोकर भरती थांबली)
याबाबत बोलताना बख्तियार म्हणाले की, 'सिंध आणि पंजाबमधील टोळांच्या हल्ल्यानंतर प्रथमच त्यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये प्रवेश केला आहे. मात्र तरी सरकार कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर संरक्षण करण्यात यशस्वी ठरले आहे. 1993 च्या तुलनेत पाकिस्तानची परिस्थिती बिकट आहे. सध्या हे टोळ चोलिस्तानजवळील पाकिस्तान-भारत सीमेवर आहेत. टोळ सिंध आणि बलुचिस्तानमधून चोलिस्तान व नारा येथे आल्याची माहिती मिळत आहे. हे टोळ इराणकडे मार्गक्रमण करणार होते, मात्र यावेळी पाकिस्तानमध्ये तापमान कमी असल्याने ते अजूनही पाकिस्तानात आहेत. सध्या संपूर्ण देश या टोळांशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.