Greta Thunberg (PC - Twitter)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या घटनांमुळे भारतामधील स्थिती गंभीर बनत चालली आहे. देशात औषधे, बेड्स, ऑक्सिजन, लस यांची कमतरता जाणवू लागली आहे, त्यामुळे लोकांमध्ये संताप व निराशा आहे. सध्या प्रत्येकजण भीतीच्या वातावरणात जगत आहे. भारतामधील कोरोना स्थितीची अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही दाखल घेतली आहे. आता भारतातील कोरोना हाहाकाराबाबत स्वीडनची पर्यावरणीय कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) दुःख व्यक्त केले आहे. थनबर्गनेने ट्विट करत जगातील तमाम देशांना भारताची मदत करण्याची विनंती केली आहे. याआधी शेतकरी आंदोलनाबाबत ट्वीट करून ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती.

ग्रेटा थनबर्गनेने जागतिक समुदायाने पुढे येऊन भारताला मदत करण्याचे आवाहन केले. तिने ट्विट केले आहे की, ‘भारतातील अलीकडील घटना हृदयद्रावक आहेत. त्यामुळे जागतिक समुदायाने पुढे येऊन भारताला मदत करण्यासाठी काही पावले उचलली पाहिजेत.’ ग्रेटा थनबर्गचे हे ट्विट अशा वेळी आले आहे जेव्हा गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना प्रकरणे समोर येत आहेत. यासह सध्या देशातील रूग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत व ऑक्सिजनची मोठी कमतरता आहे.

दरम्यान, एका नवीन अभ्यासानुसार असा अंदाज लावला गेला आहे की मेच्या सुरूवातीस, भारतात कोरोनो व्हायरस रोगामुळे होणाऱ्या दैनंदिन मृत्यूची संख्या 5000 हजारांच्यावर जाईल. वॉशिंग्टन विद्यापीठातील हेल्थ मेट्रिक्स एंड इव्हॅल्युएशन (IHME ) संस्थेने हा अभ्यास केला आहे.

भारतातील शेतकरी चळवळीदरम्यान केलेल्या ट्वीटवरून ग्रेटा वादात भोवऱ्यात सापडली होती. तिच्या ट्विटसह शेअर केलेल्या टूलकिटवरून वाद निर्माण झाला होता. भारत विरोधी कट रचत मुद्दाम आंतरराष्ट्रीय सेलेब्ज एकवटले आहेत असा आरोप त्यावेळी झाला होता. (हेही वाचा: Coronavirus: 'या संकटामध्ये शत्रुत्व विसरूया, आम्हाला तुमची मदत करू द्या'; पाकिस्तानमधून पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र)

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

ग्रेटा थनबर्ग ही हवामान संकटाविरूद्धच्या लढ्यात लढणारी अग्रगण्य व्यक्ती म्हणून ओळखली जाते. तिने अनेक वेळा आपल्या भाषणांसह लोकांची मने जिंकली आहेत. या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरचे तिचे ट्विटर वॉरवरही प्रसिद्ध आहे. डिसेंबर 2020 मध्ये, या स्वीडनमधील 16 वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला टाइम मासिकाने 2019 ची 'पर्सन ऑफ दी इयर' म्हणून सन्मानित केले.