Coronavirus: 'या संकटामध्ये शत्रुत्व विसरूया, आम्हाला तुमची मदत करू द्या'; पाकिस्तानमधून पीएम नरेंद्र मोदी यांना पत्र
India, Pakistan flags (Photo Credits: PTI)

भारतामधील कोरोना विषाणूची (Coronavirus) स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भारताच्या समर्थनार्थ हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. भारतात वाढत असलेली कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता पाहता पाकिस्तानमधील लोकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना या संकटाच्या वेळी मदत करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे पुत्र फैसल ईधी (Faisal Edhi) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी भारतात वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांविषयी चिंता व्यक्त केली आहे आणि ईधी वेलफेअर ट्रस्ट (Edhi Welfare Trust) च्या सहाय्याने मदतीचा हात पुढे केला आहे.

फैसल यांनी आपल्या पत्रात लिहिले की, 'आम्ही ईधी फाउंडेशन भारतीय लोकांवर होत असलेला कोरोना संकटाचा परिणाम पाहत आहोत. मोठ्या संख्येने लोक या साथीशी झगडत आहेत हे पाहून आम्हाला वाईट वाटते. म्हणूनच आम्ही या संकटामध्ये 50 रुग्णवाहिका ऑफर करत आहोत.’ त्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या टीममध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान, कार्यालयीन कर्मचारी, ड्रायव्हर्स आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे. यासाठीचा सर्व खर्च फाउंडेशन करेल, त्याचा भार भारतावर पडणार नाही. यासाठी त्यांनी भारतात येण्याची आणि स्थानिक आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची परवानगी मागितली आहे. (हेही वाचा: भारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांचे ट्वीट)

फैसल यांनी लिहिले आहे की,फाऊंडेशनने सर्व तयारी पूर्ण केली आहे. भारत सरकारची परवानगी मिळताच आम्ही ताबडतोब इथून निघू. ते म्हणाले की, मी स्वतः माझ्या टीमला लीड करत भारतात येऊ इच्छित आहे. या संकटाच्या वेळी शत्रुत्व विसरून आपण एकमेकांना मदत केली पाहिजे.

दरम्यान, कोरोनामुळे भारतातील रुग्णालयांची अवस्था दयनीय झाली आहे. मात्र, इंटरनेटवर भारतीय लोक एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. ऑक्सिजन सिलिंडरच्या उपलब्धतेपासून ते बेड्स, औषधांची स्थिती याबाबत ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली जात आहे. दुसरीकडे, शेजारच्या पाकिस्तानमधूनही मदतीचा हात पुढे आला आहे.