Australia Bushfire: वणवा नव्हे! ऑस्ट्रेलियातील जंगलाला जाणीवपूर्वक लावली आग; पोलिसांकडून 200 जणांवर गुन्हे दाखल, सरकारची महत्त्वपूर्ण कारवाई
Australia Bushfires (Photo Credits: Getty Images)

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात मुद्दाम लावलेल्या आगीमुळे (Australia Bushfire) आतापर्यंत कोट्यवधी जनावरे, पक्षी आणि 20 हून अधिक मानवांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबरमधील ही आग अजूनही थांबायचे नाव घेत नाही. अगोदर असे म्हटले होते की ही आग हवामान बदलामुळे लागली आहे. परंतु आता ही आग जाणीवपूर्वक लावली गेली असल्याचे समोर आले आहे. याबाबत आतापर्यंत 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत 24 जणांवर जंगलात मुद्दाम आग लावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर क्वीन्सलँडमध्ये 101 लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यातील सुमारे 70 टक्के अल्पवयीन होते. नोव्हेंबरमध्ये येथे सर्वात भीषण आग लागली होती.

ऑस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने म्हटले आहे की, न्यू साउथ वेल्स (एनएसडब्ल्यू), क्वीन्सलँड, व्हिक्टोरिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया या प्रांतांमध्ये या लोकांना अटक करण्यात आली होती. आगीचा सर्वाधिक परिणाम कोआला प्राण्यांच्या प्रजातीवर झाला आहे. न्यू साउथ वेल्सच्या मध्य-उत्तरी प्रदेशात कोआल्सची संख्या सर्वाधिक आहे. जंगलात लागलेल्या आगीमुळे त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मृत्यूमध्ये समाविष्ट असलेल्या प्राण्यांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचा समावेश आहे. (हेही वाचा: तब्बल 10 हजार उंटांची गोळ्या घालून करणार हत्या: ऑस्ट्रेलियात जंगलांला लागलेल्या वनव्यानंतर स्थानिक प्रशासनाचा धक्कादायक निर्णय)

या आठवड्यात किनार्‍याच्या दिशेने जाणाऱ्या आगीत 200 हून अधिक घरे देखील नष्ट झाली आहेत. सतत वाढत असलेल्या आगीचा परिणाम आता सिडनी येथे पोहोचला असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या हंगामात आगीच्या घटनांमध्ये किमान 18 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. मेलबर्न विद्यापीठाचे प्राध्यापक स्टेनली म्हणाले की, ही आग लावणाऱ्यांचे वय 12-24 वर्षे दरम्यान आहे. तर काही अगदीच अल्पवयीन आहेत. सध्या तेथे पाऊस सुरू झाला असून, आग आटोक्यात आणली जात असल्याचे बोलले जात आहे.

2009 मध्ये व्हिक्टोरिया येथे आग लावल्याबद्दल ब्रॅंडन सोकलुक या माजी स्वयंसेवक अग्निशमन कर्मचाऱ्याला 17 वर्षे आणि नऊ महिने तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.