चीन मधून सुरू झालेलं कोरोना व्हायरसचं थैमान मागील तीन महिन्यात बघता बघता जगभर पसरलं आणि आता या कोरोना व्हायरसने 75 हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोव्हिड 19 हा आजार होतो. शिंक किंवा खोकल्याच्या थुंकीमधून उडणार्या तुषारांद्वारा कोरोनाचा संसर्ग होतो. झपाट्याने पसरत असलेल्या या कोरोना व्हायरसचे सध्या जगभरात 13 लाखाहून अधिक बाधित रूग्ण आहे. चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस युरोपातील इटली, स्पेन, जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात पसरलं या प्रत्येक देशांमध्ये लाखभरापेक्षा अधिक रूग्ण आहेत. सध्या युरोपापाठोपाठ अमेरिका हे कोरोना व्हायरस संसर्गाचं केंद्र बनलं आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाचे दहा हजाराहून अधिक बळी गेले आहेत. तर इटलीमध्ये 16 हजार आणि स्पेन मध्ये 13 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुमारे 14 दिवसांत त्याची लक्षणं दिसतात. मात्र अनेक रूग्णांमध्ये कोरोनाची लागण होऊनदेखील लक्षणं न दिसल्याने खूप मोठ्या प्रमाणात कोरोनाचे सायलंट ट्रॅव्हलरदेखील ठरले. यामुळेच झपाट्याने कोरोना पसरल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरस संसर्गाला जागतिक आरोग्य संकट म्हणून घोषित केले आहे. तसेच एकाच वेळी जगभर धुमाकूळ घालणारा आणि इतक्या झपाट्याने पसरणारा कोव्हिड 19 हा पहिलाच आजार आहे. Coronavirus: डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर भारत सरकारने 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंधे हटवली; कोरोनाशी लढण्यासाठी गरजू देशांना मदत करण्याचे आश्वासन.
सध्या कोरोना व्हायरसचं उत्पत्ती स्थान असलेल्या चीनमध्ये हा आजार आता नियंत्रणात आल्याचं सांगितलं आहे. वुहानमधून पसरलेल्या या आजाराचा आता नवीन रूग्ण नाही तसेच मागील 24 तासात चीनमध्ये मृत्यूचीदेखील नोंद नाही. दरम्यान इतक्या झपाट्याने पसरणार्या कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणताही ठोस उपचार किंवा लस नाही. जगाच्या विविध भागांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जगभरात खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला जात आहे. सोबत निम्म जग सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. घरीच रहा सुरक्षित रहा या नियमानुसार सध्या कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी पाळत आहे.
भारतामध्ये कोरोनाचे 4421 रूग्ण आहेत. त्यापैकी 3981 अॅक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर 114 जणांनी भारतामध्ये कोरोनाशी लढा देताना प्राण गमावले. 326 भारतीयांनी कोरोनावर मातदेखील केली आहे.