Representational Image (Photo Credits: IANS)

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत मृतांचा आकडा 5 हजारांच्या वर गेला आहे. तर कोरोना व्हायरसचे परिणाम भारतासह पाकिस्तानात सुद्धा दिसून येत आहेत. येथे सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तान येथे 900 पेक्षा अधिक जणांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याच पार्श्वभुमीवर पाकिस्तान मधील सर्व पॅसेंजर ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. येथे कोरोनाचे 903 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक प्रकरणे सिंध प्रांतातील असून येथील 394 प्रकरणे समोर आली आहेत. तसेच पंजाब, इस्लामाबाद आणि बलूचिस्तान येथे सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी देशाला संबोधित करत असे म्हटले होते की, संपूर्ण राज्यात लॉकडाउन करु शकत नाही. कारण पाकिस्तानातील जवळजवळ 25 टक्के जण हे दारिद्र रेषेखालील आहेत. त्यामुळे जर लॉकडाउन राज्यात केले तर या लोकांच्या खाण्यापिण्याचे हाल होतील. मात्र नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

दुसऱ्या बाजूला इराण येथून परतलेल्या त्यांच्या कर्मचाऱ्यासोबत 6 अधिकारी सेल्फी घेत होते. मात्र सेल्फी घेताना त्या व्यक्तीमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण दिसून आली नव्हती. सेल्फीचे फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ज्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीसोबत सेल्फी घेतले त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे.