
इस्त्राईलचे (Israeli) आरोग्यमंत्री याकोव लित्जमैन (Yaakov Litzman) यांनाही कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमन झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री याकोव लित्जमैन यांच्याशी संपर्क आल्याने मोसाद प्रमुख योस्सी कोहेन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मी बेन शब्बात यांनाही कोरोना व्हायरस लागण झाल्याचे वृत्त आहे. मोसाद ही इस्त्राईलची गुप्तचर संस्था आहे. इस्त्राईलच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिंना कोरोना व्हायरसची लागण झाल्याने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही कोरोना व्हायरस लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नेतन्याहू यांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे ते संक्रमीत आढळून आले नाहीत.
आरोग्यमंत्री याकोव लित्जमैन यांना गुरुवारी (2 एप्रिल) या दिवशी कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले. त्यांची प्रकृती सथ्या ठिक असून त्यांच्यवर उपचार सुरु आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून जे लोक आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात आले आहेत अशा सर्वांची शोध घेतला जाऊन त्यांची कोरोना व्हायरस चाचणी केली जाणार आहे. ईस्त्राईलच्या मंत्रालयाने म्हटले आहे की, सल्लागार सहाय्यक आणि सचिवालय कर्मचाऱ्यांची टीम वर्क फ्रॉम होम करणार आहे. तसेच, आवश्यकता भासल्यास टेलिफोन अथवा मोबाईलच्या माध्यमातून संवाद कायम ठेवला जाईल.
आरोग्य मंत्रालयाने 12 न्यूजला अधिकृत प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आरोग्यमंत्र्यांमध्ये कोरोना व्हायरस लागण झाल्याची प्राथमिक लक्षणं दिसत आहेत. मात्र, अद्याप या गोष्टीची पुष्टी होऊ शकली नाही की, ते कोरोना व्हायरस बाधित व्यक्तिच्या संपर्कात आलेच कसे. मंत्रालयाचे उप महानिदेशक म्हणून काम पाहणारे डॉ. इतामार ग्रोटो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोग्यमंत्र्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसली आहेत. इतकेच. त्यांना फार विशेष असा त्रास नाही. (हेही वाचा, Coronavirus Outbreak: जगभरात कोरोना व्हायरसमुळे 47 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू, इटली मध्ये स्थिती भयंकर)
दरम्यान, दैनिक हारेत्जने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्राईलमध्ये आतापर्यंत 6211 व्यक्तिंना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यातील 107 जणांचे स्थिती गंभीर आहे. 241 नागरिकांच्या प्रकृतीत उपचारानंतर सुधारणा आहे.