Cobra Gold Exercise (संग्रहित संपादित प्रतिमा)

प्राणी हक्क संस्था पेटा (PETA) गुरुवारी पेंटॅगॉनच्या बाहेर एका महत्वाच्या मुद्द्याबाबत आंदोलन करणार आहे. एका प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती दिली आहे. या संस्थेची इच्छा आहे की, संरक्षण विभागाने आपल्या नौसैनिकांना कोब्राचे (Cobra) रक्त पिणे थांबवायला सांगावे. कोरोना विषाणू महामारीमुळे अनेकांनी स्वतःहून शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. अशात पेटाने थायलंडमध्ये झालेल्या कोब्रा गोल्ड एक्सरसाइजचे (Cobra Gold Exercise), बहुराष्ट्रीय संयुक्त सैन्य कार्यक्रमाचे फोटो जगासमोर ठेवले आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मरीन आणि सैनिक जंगलामध्ये प्रशिक्षण घेतात. या प्रशिक्षणात, कोब्राचे तुकडे करुन त्यांचे रक्त पिणे ही गोष्ट समाविष्ट आहे.

फेब्रुवारी महिन्यात पेटाने डीओडीला या कार्यक्रमादरम्यान जिवंत प्राण्यांची हत्या थांबविण्यास सांगणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सांगितले होते की, 'कोब्रा गोल्ड दरम्यान, अनेक टास्क पूर्ण करायचे असतात. अशावेळी थायलंडमधील मरीन आणि प्रशिक्षण देणारे शिक्षक कोंबड्यांना त्यांच्या उघड्या हातांनी जिवे मारतात, जिवंत विंचू, सरडे व इतर सरपटणारे प्राणी खातात. महत्वाचे म्हणजे ते नष्ट होणाऱ्या असुरक्षित प्रजाती समजल्या जाणाऱ्या किंग कोब्रालाही मारतात.’ याचिकेमध्ये पुढे म्हटले आहे, ‘अशा प्रकारच्या अभ्यासासाठी प्राणीमुक्त पध्दती अस्तित्वात आहेत. त्यामुळे प्राण्यांवर अन्याय होणाऱ्या व सैन्यासाठी अनावश्यक असणाऱ्या पद्धत्ती बंद कराव्यात.’

याचिकेत असेही सुचवले गेले आहे की, अशा प्रथांमुळे कोविड सारखे झुनोटिक रोग होऊ शकतात. कोरोना व्हायरस महामारीमुळे यंदाचा कोब्रा गोल्ड एक्सरसाइज लांबणीवर पडला आहे. म्हणजेच जंगलातील प्राणी वाचविण्यासाठी अद्याप पेटाकडे वेळ आहे. पेटा यंदाचा कोब्रा गोल्ड एक्सरसाइज थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभुमीवर कार्यकर्ते उद्या दुपारी 12 वाजता पेंटॅगॉनच्या बाहेर निषेध करतील. यावेळी हे लोक, मरीन सापाचे रक्त पित असल्याचे फोटो प्रदर्शित करतील. (हेही वाचा:  अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांवर चक्क बाटल्यांमध्ये लघुशंका करण्याची वेळ; कंपनीने मागितली माफी)

दरम्यान, कोब्रा गोल्ड एक्सरसाइजमधील टास्क कठीण काळात जिवंत राहण्यासाठी केले जातात. हा कार्यक्रम थायलंडच्या रॉयल थाई मरीन सैनिकांकडून आयोजित केला आहे. या एक्सरसाइजमध्ये अमेरिकन सैनिक सहभागी झाले होते. यासह सिंगापूर, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि मलेशियाचे सैन्यही या कार्यक्रमाचा भाग होते. पेटाच्या आक्षेपानंतर डब्ल्यूएचओनेही असे प्रशिक्षण पूर्णपणे बंद केले जावे यावर सहमती दर्शविली आहे.