जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अॅमेझॉन आपल्या कर्मचार्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप कंपनीवर केला गेला होता. कर्मचार्यांवर कामाचे इतके ओझे आहे की, त्यांना शौचालयाला जाण्यासाठीही वेळ मिळत नसल्याची माहिती समोर आली होती. कंपनीचे ड्रायव्हर चक्क बाटल्यांमध्ये लघुशंका करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर कंपनीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. अॅमेझॉनने या आरोपांचे खंडन केले होते मात्र आता त्यांनी याबाबत माफी मागितली आहे.
गेल्या आठवड्यात अमेरिकेतील विस्कॉन्सिनचे डेमोक्रॅटचे खासदार मार्क पोकन यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'कामगारांना तासाला 15 डॉलर्स देणे हे प्रगतीशील कामाचे ठिकाण बनत नाही. एकीकडे तुम्ही त्यांना युनियन तयार करण्यास परवानगी देत नाही आणि दुसरीकडे त्यांना बाटल्यांमध्ये लघुशंका करण्यास भाग पाडले जात आहे.' काही काळापूर्वी, अॅमेझॉनने अलाबामा येथील सुविधेत कर्मचारी संघटना स्थापण्यास विरोध केला होता आणि त्याच संदर्भात पोकन यांचे ट्विट होते.
यांनतर, ताबडतोब अॅमेझॉनने आपल्या अधिकृत खात्यावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, ‘बाटल्यांमध्ये लघवी करण्यासारख्या गोष्टींवर तुम्ही खरेच विश्वास ठेवला की काय? जर ही गोष्ट सत्य असेल तर कोणीही आमच्यासाठी काम करणार नाही.’ परंतु नंतर बर्याच वृत्त माध्यमांतून असे वृत्त दिले गेले की, अॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या बर्याच जणांनी असे केले आहे. महत्वाचे म्हणजे कित्येकांनी असे सांगितले की, बर्याच वेळा लघवी करण्यासाठी त्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.
पुढे ‘द इंटरसेप्ट’ वेबसाइटने म्हटले होते की, त्यांनी काही अंतर्गत कागदपत्रे मिळविली आहेत ज्यावरून असे दिसून येते की, अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या चालकांच्या या समस्येविषयी माहिती होती. यानंतर आता अॅमेझॉनने शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध करत, अमेरिकेचे खासदार पोकन यांची माफी मागितली. अॅमेझॉन म्हणाले, ‘आमचे ट्विट चुकीचे होते. मोठ्या संख्येने आमच्याशी जोडले गेलेल्या चालकांचा त्यामध्ये विचार केला गेला नाही. यामध्ये वस्तूंच्या पुरवठ्याच्या केंद्रांविषयी भाष्य केले होते, जेथे कर्मचाऱ्यांसाठी डझनभर शौचालये उपलब्ध आहेत.’