China: मुलांच्या गैरवर्तवणूकीची शिक्षा मिळणार पालकांना, चीनमध्ये बनवला जात आहे नवा कायदा
चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग (Photo: Getty)

चीन (China) देश हा जसा त्याच्या धूर्तपणासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो तिथल्या चित्र-विचित्र कायद्यांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. आता चीनचे शी जिनपिंग (Xi Jinping) सरकार लवकरच असा कायदा आणण्याच्या तयारीत आहे, ज्यात देशातील मुलांच्या चुकांची शिक्षा त्यांच्या पालकांना होईल. चीनची संसद अशा कायद्याचा विचार करत आहे, ज्याअंतर्गत पालकांना मुलांच्या गैरकृत्यासाठी जबाबदार धरले जाईल. 'फॅमिली एज्युकेशन प्रमोशन लॉ' च्या मसुद्याअंतर्गत, पालकांच्या देखरेखीखा मुलांचे वर्तवणूक वाईट ठरले किंवा ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आढळले तर पालकांना फटकारले जाईल.

यासह, त्यांना कौटुंबिक शिक्षण मार्गदर्शन कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले जातील. नॅशनल पीपल्स काँग्रेस (एनपीसी) अंतर्गत कायदेविषयक आयोगाचे प्रवक्ते जंग तिवेक म्हणाले की, ‘किशोरवयीन मुलांच्या गैरवर्तनाची अनेक कारणे आहेत आणि त्यातील मुख्य कारण म्हणजे कौटुंबिक शिक्षणाचा अभाव किंवा अयोग्य कौटुंबिक शिक्षण हे आहे.’

नवीन कायद्याच्या मसुद्याअंतर्गत, जर मुलांनी कायदेशीर वयापेक्षा कमी वयाचा गुन्हा केला असेल, तर त्यांच्या पालकांना अधिकाऱ्यांकडून शिक्षा होईल. चीनमधील बहुतेक गुन्ह्यांसाठी कायदेशीर वय 16 आहे. जर कुटुंबाने नियमांचे पालन केले नाही तर त्यांना चेतावणी दिली जाईल. गुन्ह्याच्या गांभीर्यावर अवलंबून, पालकांना 1000 युआन (सुमारे 11 हजार रुपये) दंड ठोठावला जाईल किंवा त्यांना पाच दिवस कोठडीत ठेवले जाईल. चीनचे म्हणणे आहे की, या कायद्याचा उद्देश संपूर्ण देशात पालकत्व कौशल्ये, नीतीमत्ता आणि समाजवादाच्या मूळ मूल्यांना प्रोत्साहन देणे आहे.

तरुणांमध्ये ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाचा सामना करण्यासाठी बीजिंगने यावर्षी कडक नियम लागू केले होते. अलिकडच्या काही महिन्यांमध्ये, शिक्षण मंत्रालयाने अल्पवयीन मुलांसाठी ऑनलाइन गेम खेळण्यासाठीचे तास मर्यादित केले आहेत. नवीन वेळेनुसार, त्यांना फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवारी एक तास ऑनलाइन गेम खेळण्याची परवानगी आहे. यासह, चीन सरकारने मुलांचा गृहपाठ देखील कमी केला आहे. शनिवार व रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी मुख्य विषयांसाठी शाळेनंतर शिकवण्यांवर बंदी घातली आहे.