युनिलिव्हर (Unilever) या सुप्रसिद्ध कंपनीच्या अनेक ब्रँडच्या शाम्पूमध्ये (Shampoos) कॅन्सर (Cancer) निर्माण करणारे रसायन सापडले आहे. त्यानंतर आता कंपनीने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि TRESemmé aerosol ड्राय शाम्पू परत मागवले आहेत. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या उत्पादनांमध्ये बेंझिनची उपस्थिती आढळून आली आहे. या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो. यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) नुसार, ही उत्पादने ऑक्टोबर 2021 पूर्वी तयार करण्यात आली होती आणि देशभरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत करण्यात आली होती.
या उत्पादनांमध्ये, Dove Dry Shampoo Volume and Fullness, Dove Dry Shampoo Fresh Coconut, Nexxus Dry Shampoo Refreshing Mist आणि Suave Professionals Dry Shampoo Refresh and Revive यांचा समावेश आहे.
एफडीएने आपल्या रिकॉल नोटीसमध्ये म्हटले आहे की, बेंझिन मानवी शरीरात अनेक प्रकारे प्रवेश करू शकते. तो वासाने, तोंडातून आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे रक्ताचा कर्करोग होऊ शकतो. एफडीएने पुढे सांगितले की, लोकांनी अशा उत्पादनांचा वापर करणे थांबवावे आणि त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी UnileverRecall.com च्या वेबसाइटला भेट द्यावी. युनिलिव्हरने यावर अद्याप भाष्य केले नाही. (हेही वाचा: L'oreal Products: सावधान! लोरिअलचे प्रॉडक्ट्स वापरल्या कर्करोग होण्याची संभावना? न्यायालयात याचिका दाखल)
युनिलिव्हरच्या या निर्णयामुळे पर्सनल केअर उत्पादनांमध्ये एरोसोलच्या उपस्थितीबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या दीड वर्षात बाजारातून अनेक एरोसोल सनस्क्रीन परत मागवण्यात आले आहेत. यामध्ये Johnson & Johnson कंपनीने Neutrogena, Edgewell Personal Care Co. चे Banana Boat आणि Beiersdorf AG’s चे Coppertone यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी, प्रॉक्टर अँड गॅम्बलने देखील 30 हून अधिक एरोसोल स्प्रे हेअरकेअर उत्पादने देखील परत मागवली होती. यामध्ये ड्राय शॅम्पू आणि ड्राय कंडिशनरचा समावेश होता. या उत्पादनांमध्ये बेंझिन असू शकते, असा इशारा कंपनीने दिला होता. कंपनीने ओल्ड स्पाईस आणि सीक्रेट ब्रँड्सचे डिओडोरंट्स आणि स्प्रे देखील परत मागवले आहेत. त्यामध्ये बेंझिन असू शकते, अशी भीती कंपनीला होती.