PepsiCo, unilever (फोटो सौजन्य - फेसबुक)

पेप्सिको (PepsiCo), युनिलिव्हर (Unilever) आणि डॅनोन (Danone) सारख्या जागतिक पॅकेज्ड फूड कंपन्या (Global Packaged Food Companies) भारत आणि इतर कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कमी आरोग्यदायी उत्पादने विकत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ग्लोबल पब्लिक नॉन-प्रॉफिट फाऊंडेशन ऍक्सेस टू न्यूट्रिशन इनिशिएटिव्ह (ATNI) च्या नवीन निर्देशांक अहवालात हा आरोप करण्यात आला आहे. ATNI ग्लोबल इंडेक्सच्या अहवालानुसार, या कंपन्या भारतासह अनेक देशांमध्ये निकृष्ट दर्जाची उत्पादने विकत आहेत. अहवालात इथिओपिया, घाना, भारत, केनिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलीपिन्स, टांझानिया आणि व्हिएतना या कमी आणि निम्न-मध्यम उत्पन्न असलेले देशांमध्ये निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची विक्री केली आहे.

पेप्सिको भारतात पेप्सी, सेव्हनअप, स्लाइस, स्टिंग, लेज चिप्स, कुरकुरे इत्यादींची विक्री करते. तर युनिलिव्हर हॉर्लिक्स, रेड लेव्हल टी, ताजमहाल टी, क्लोज अप टूथपेस्ट, क्लिनिक प्लस शैम्पू आणि तेल, डोव्ह साबण इत्यादी वस्तूंची विक्री करते. याशिवाय डॅनोन बाळाच्या खाद्यपदार्थांची विक्री करते, ज्यात प्रोटिनेक्सचाही समावेश आहे.

युरोपमध्ये विकली जात आहेत चांगल्या दर्जाची उत्पादने -

उत्पादनाची गुणवत्ता अहवालातील उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार, Lays चिप्स आणि ट्रॉपिकाना ज्यूस बनवणाऱ्या पेप्सिकोने न्यूट्री-स्कोअर A/B पूर्ण करणाऱ्या उत्पादनांची विक्री वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु हे फक्त त्याच्या युरोपमधील स्नॅक्स पोर्टफोलिओवर लागू होते. युनिलिव्हरच्या फूड प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये क्वालिटी वॉल्स आणि मॅग्नम आइस्क्रीम आणि नॉर सूप आणि रेडी-टू-कूक मिक्स यांचा समावेश आहे. तथापी, डॅनोन प्रोटिनेक्स सप्लिमेंट्स आणि ऍप्टामिल इन्फंट फॉर्म्युला भारतात विकते.

हेल्थ स्टार रेटिंग सिस्टम अंतर्गत, यूएस-आधारित ATNI निर्देशांकानुसार, उत्पादनांना त्यांच्या 5 गुणांपैकी 5 गुणांच्या आधारे रेट केले जाते. ज्यामध्ये 5 हा सर्वोत्तम स्कोअर आहे आणि 3.5 च्या वरचा स्कोअर आरोग्यदायी मानला जातो. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, अन्न कंपन्यांच्या पोर्टफोलिओची चाचणी घेण्यात आली आणि त्यांना 1.8 च्या स्कोअरवर स्थान देण्यात आले. उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये अशा उत्पादनांना सरासरी 2.3 गुण मिळाले आहेत.