कोरोना विषाणूचा (Coronavirus) उगम चीन (China) मध्ये झाला होता. त्यानंतर आता जगातील जवळजवळ सर्व देश या विषाणूशी झुंज देत आहेत. आता चीनमधून अजून एक वाईट बातमी आली आहे. सध्या चीनमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे नवीन रोग पसरत आहे. गांसु प्रांताची राजधानी असलेल्या लान्झहूच्या आरोग्य विभागाने सांगितले की, येथील 3,245 लोक ब्रुसेलोसिस (Brucellosis) हा आजाराने ग्रासले आहेत. आयोगाच्या म्हणण्यानुसार हा आजार प्राण्यांच्या संपर्कात आल्याने होतो. या आजाराचे संक्रमण नवीन 1,401 लोकांमध्ये आढळले आहे, ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या आजारामुळे कुणाचा मृत्यू झालेला नाही.
मागील वर्षी बायोफार्मास्युटिकल कंपनीतील गळतीमुळे हा आजार पसरला होता. त्यावेळी डिसेंबरमध्ये जवळजवळ 200 लोक संक्रमित झाले होते. आता आरोग्य अधिकाऱ्यांनी शहरातील 29 लाख लोकसंख्येपैकी 21,847 लोकांची चाचणी केली आहे. हा आजार माल्टा ताप (Malta Fever) किंवा Mediterranean Fever म्हणूनही ओळखला जातो. ज्यामध्ये रुग्णाला डोकेदुखी, स्नायू दुखण्याचा त्रास आणि थकवा अशी अनेक लक्षणे दिसतात.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या मते, या आजारामुळे उद्भवणारी काही लक्षणे जुनी असू शकतात जी कधी संपुष्टात येऊ शकत नाहीत, जसे की संधिवात किंवा काही अवयवांमध्ये. सूज इ. 1980 मध्ये चीनमध्ये ब्रुसेलोसिस हा एक सामान्य आजार होता, परंतु नंतर तो घटला. आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत ब्रुसेलोसिसच्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमणाचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन असे नमूद करते की, ब्रुसेलोसिसचे व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारे प्रसारण अत्यंत दुर्मिळ आहे.
या रोगाला असेल लोक जास्त बळी पडतात, जे दूषित अन्न खातात किंवा ज्यांना श्वास घेताना बॅक्टेरियाचा संसर्ग होतो. दरम्यान, चीनच्या सरकारी दैनंदिन अहवालात या रोगाला बळी पडलेल्या लोकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आणि रोगाचा प्रसार आणि त्याचे परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे.