कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटकाळात आता बर्ड फ्लूने (Bird Flu) थैमान घालायला सुरुवात केली आहे. आता मानवांमध्ये बर्ड फ्लू विषाणूचा संसर्ग झाल्याची जगातील पहिली घटना रशियामध्ये (Russia) घडली आहे. मानवांमध्ये एच 5 एन 8 (H5N8) एव्हियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लू विषाणू आढळल्याची रशियाने पुष्टी केली आहे. रशियाच्या रिसर्च सेंटर वेक्टरच्या शास्त्रज्ञांनी शनिवारी माहिती दिली की, पोल्ट्री फार्ममधील सात कर्मचारी बर्ड फ्लूने बाधित असल्याचे आढळले आहे. रोस्पोट्रेनाडझोरच्या वेक्टर रिसर्च सेंटरमध्ये हा विषाणू मानवांमध्ये सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
अण्णा पोपोव्हा यांनी रशिया 24 ब्रॉडकास्टरला माहिती दिली की, डिसेंबरच्या महिन्यात रशियाच्या दक्षिणेस एका पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लू विषाणू आढळून आला होता. त्यानंतर ओठे काम करणाऱ्या 7 लोकांमध्ये हा विषाणू दिसून आला. त्यांचे नमुना डब्ल्यूएचओकडे पाठविण्यात आले आहेत. या विषाणू पक्षांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे मात्र आता त्यांचा मानवी शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत रिसर्च होईल. जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.
हा विषाणू केवळ रशियामध्येच नाही तर, युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्ये पोल्ट्रीमध्ये आढळला आहे. आता रशियामध्ये पहिल्यांदा तो मानवांमध्ये आढळला. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्येही बर्ड फ्लूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बऱ्याच राज्यात कावळे आणि इतर पक्षी मृत सापडले आहेत. त्याशिवाय खबरदारीचा उपाय म्हणून कोंबड्यांना काही ठिकाणी ठार मारण्याचे आदेशही देण्यात आले होते. (हेही वाचा: WHO च्या टीमला वूहानमध्ये आढळले Coronavirus चे 13 वेगवेगळे व्हेरिएंट; शहरातील कोरोनाचा कहर अंदाजापेक्षा 500 टक्के जास्त होता)
महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली आहे. सर्व कुक्कुट पक्षीधारकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे तंतोतंत पालन करावे, शास्त्रीय आधार नसलेले गैरसमज, अफवा पसरवू नयेत असे आवाहन पशुसंवर्धनमंत्रांनी केले आहे. तसेच अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असेही त्यांनी सांगितले आहे.