Indian Student Dies In US: अमेरिकेतून (America) अलीकडे भारतीयांच्या (Indian Student) मृत्यूच्या बातम्या येत आहेत. आता आणखी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये बुधवारी झालेल्या बाईक अपघातात (Accident) एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. भारतीय वाणिज्य दूतावासाने गुरुवारी ही माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील एका भारतीय विद्यार्थ्याचा न्यूयॉर्कमध्ये अपघातात मृत्यू झाला. बेलेम अच्युत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे, जो न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीचा (SUNY) विद्यार्थी होता. न्यूयॉर्कमधील भारतीय मिशनने सोशल मीडिया पोस्टमध्ये अच्युथच्या मृत्यूची माहिती दिली आणि शोक व्यक्त केला. अधिकारी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि त्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी सर्व शक्य मदत करत आहेत.
यूएस शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या म्हणण्यानुसार, काल संध्याकाळी बाईक अपघातात सापडलेल्या आणि मरण पावलेल्या बेलेम अच्युथ या SUNY विद्यार्थ्याच्या अकाली निधनाबद्दल ऐकल्यानंतर दुःख झाले. कुटुंबाप्रती आम्ही तीव्र शोक व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबीय आणि स्थानिक एजन्सींच्या संपर्कात राहून मृत विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात परत आणण्यासह सर्व मदत केली जाईल, असे न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले आहे. (हेही वाचा -Indian Student Dies IN US: ओहायो येथे भारतीय विद्यार्थिंनीचा मृत्यू, पोलिस तपास सुरु; कारण अस्पष्ट)
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि हल्ल्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2024 मध्ये, 11 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. भारत सरकारने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, ते त्यांच्या समकक्षांशी चिंता व्यक्त करत आहेत. अमेरिकन अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचंही सरकारने म्हटलं आहे. (हेही वाचा -Indian Student Dies of Cardiac Arrest: कॅनडात 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मुलाचा मृतदेह आणण्यासाठी कुटुंबियांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील अल्फारेटा शहरात एका भीषण कार अपघातात तीन भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. अल्फारेटा पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की घटनास्थळावरील पुराव्याच्या आधारे असे मानले जाते की, ड्रायव्हरचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे ते झाडामध्ये अडकले. या अपघातात आर्यन जोशी, श्रिया अवसरला आणि अन्वी शर्मा यांचा मृत्यू झाला होता.