Afghanistan Flood (संग्रहित संपादित प्रतिमा)

Afghanistan Flood: अफगाणिस्तानमध्ये दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. अमेरिकन मीडिया सीएनएनच्या मते, वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP) ने 12 मे रोजी बदख्शान, घोर, बागलान आणि हेरातमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले. मुसळधार पावसामुळे 1600 लोक जखमी झाले असून, 2000 हून अधिक घरे वाहून गेली आहेत. डब्ल्यूएफपीने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अचानक आलेल्या पुरामुळे अफगाणिस्तानमध्ये मोठा विनाश ओढवला आहे.

देशात बागलाणमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, यासह इथे 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बागलानकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे तेथे मदत देण्यास विलंब होत आहे. तेथून लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कर पाठवण्यात आले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय संघटनांना मदत करण्यास सांगितले आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार, संघटनांनी मदत केली नाही देशात तर हजारो लोक मरतील.

मुसळधार पाऊस आणि नद्या फुटल्याने शेतजमिनी आणि रस्ते जलमय झाले आहेत. अनेक घरेही पाण्याखाली गेली. परिस्थिती पाहता आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्यात अनेक समस्या येत आहेत, कारण बहुतांश भागात वाहने पोहोचणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पूरग्रस्त भागात अन्नपदार्थ पोहोचवण्यासाठी, तसेच इतर मदतीसाठी गाढवांचा वापर केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अफगाणिस्तानला मदत म्हणून 7 टन औषधे आणि आपत्कालीन किट पाठवले आहेत. (हेही वाचा: Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये 4.5 तीव्रतेचा भुकंप, कोणतीही जीवितहानी नाही)

इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटी (IRC) च्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानच्या बहुतांश राज्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध आपत्कालीन दल मदतकार्यात गुंतले आहेत. आयआरसीच्या संचालक सलमा बेन आयसा यांनी सांगितले की, या पुरामुळे मानवतावादी संकट आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भूकंपाचा फटका अफगाणिस्तानच्या लोकांना सोसावा लागत होता. मात्र आता पुराने त्यांना आणखी गरिबीत ढकलले आहे. अफगाणिस्तानातील अनेक राज्यांमध्ये दोन आठवड्यांपासून वीज नाही. एक वेळचे जेवण विकत घेण्यासाठी लोकांकडे संसाधने नाहीत. याआधी एप्रिल महिन्यातही अफगाणिस्तानात अतिवृष्टी आणि पुरामुळे 70 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय सुमारे 2000 घरे, तीन मशिदी आणि चार शाळाही त्या पुरात उद्ध्वस्त झाल्या होत्या.