WhatsApp (PC- Pixabay)

आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्सबाबत (Spam Call) भारत सरकारने व्हॉट्सअॅपला (WhatsApp) नोटीस दिली होती, आता व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने त्याला उत्तर दिले आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्टेड सेवांमध्ये आघाडीवर आहोत. आम्ही व्हॉट्सअॅपमध्ये ब्लॉक आणि रिपोर्ट सारखे फीचर्स प्रदान करत आहोत. आम्ही वापरकर्त्यांना सुरक्षेची माहिती देत आहोत, त्यांना जागरूक करत आहोत. युजर्सच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या घटकांना आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून सक्रियपणे बाहेर काढत आहोत.’

व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, ‘असे असूनही फसवणूक करणारे लोकांना फसवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. आंतरराष्ट्रीय स्कॅम कॉल ही अशीच एक नवीन पद्धत आहे, जी फसवणूक करणार्‍यांनी अलीकडे अवलंबली आहे. याद्वारे लोकांना मिस्ड कॉल देऊन, त्यांना परत आपल्याला कॉल करण्यास किंवा मेसेज करण्यास उद्युक्त केले जाते. त्यानंतर युजर्सची फसवणूक केली जाते.’

ते पुढे म्हणतात, ‘म्हणून अशा घटना लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आम्ही आमच्या AI आणि ML प्रणाली त्वरीत वाढवल्या आहेत. आमच्या या नवीन अंमलबजावणीमुळे सध्याचा कॉलिंग दर किमान 50 टक्के कमी होईल. याद्वारे आम्ही सध्याच्या घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याची अपेक्षा करतो. आमच्या वापरकर्त्यांसाठी सुरक्षित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अथकपणे काम करत राहू.'

दरम्यान, अज्ञात आंतरराष्ट्रीय नंबरवरून व्हॉट्सअॅप स्पॅम कॉलच्या समस्येची दखल घेत, आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले होते की, ‘आयटी मंत्रालय कंपनीला नोटीस पाठवेल. वापरकर्त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे. सरकार कंपनीकडून कथित गैरवापर किंवा वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या कथित उल्लंघनावर प्रतिक्रिया मागणार आहे.’ त्यावर आता व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा: WhatsApp Alert: व्हॉट्सअॅपवर मोठा आरोप; वापर होत नसताना करत आहे मायक्रोफोन एक्सेस, IT Ministry करणार चौकशी)

स्पॅम कॉलपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जाणून घ्या काही टिप्स-

  • तुम्ही ओळखत नसलेल्या क्रमांकावरील कॉलला कधीही उत्तर देऊ नका.
  • एखाद्या संशयास्पद नंबरवरून कॉलला उत्तर दिल्यास, ताबडतोब हँग अप करा.
  • अनोळखी लोकांकडून प्राप्त झालेल्या ईमेल किंवा टेक्स्ट मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका.
  • आपली कोणतीही माहिती ऑनलाइन शेअर करताना काळजी घ्या.
  • तुमच्या ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि द्वि-घटक प्रमाणीकरण वापरा.
  • तुमचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवत जा.
  • नवीन घोटाळे, स्कॅम आणि फिशिंग हल्ल्यांबद्दल जागरूक रहा.