Gionee Logo | (Photo Credits: VectorSeekLogos)

चीनमधील (China) एका कोर्टाने चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी जिओनीशी (Gionee) संबंधित एक मोठा निर्णय दिला आहे. निकालानुसार, जिओनी मोबाईलच्या सहाय्यक कंपनीने जाणीवपूर्वक 20 दशलक्षपेक्षा अधिक डिव्हायसेसमध्ये ट्रोजन हॉर्स व्हायरसची (Trojan Horse Virus) इंजेक्शन दिली होती. वापरकर्त्यांना न कळू देता त्यांना अवांछित जाहिराती दाखवणे आणि इतर Manufacturers क्रियाकलाप करणे हे या व्हायरसचे काम होते. याद्वारे कंपनीने कोट्यवधींची कमाई केली आहे. चीन जजमेंट डॉक्युमेंट नेटवर्कच्या अहवालानुसार, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान अॅपच्या माध्यमातून 2 कोटींपेक्षा जास्त जियोनी फोन जाणीवपूर्वक ट्रोजन हॉर्स मालवेअरने संसर्गित करण्यात आले होते.

जिओनीची सहाय्यक कंपनी शेन्झेन झिपू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड (Shenzhen Zhipu Technology Ltd) ने अ‍ॅपच्या अपडेटद्वारे या फोनमध्ये विषाणू सोडले होते. जेव्हा वापरकर्त्यांनी 'स्टोरी लॉकस्क्रीन अ‍ॅप' अपडेट केले, तेव्हा वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय इतर सॉफ्टवेअरदेखील स्वयंचलितपणे अपडेट झाले. ज्याद्वारे या व्हायरसने फोनमध्ये प्रवेश केला.

अहवालानुसार, डिसेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत कंपनीने ट्रोजन हार्सद्वारे 42 लाख डॉलर (सुमारे 31 कोटी रुपये) कमावले. याच काळात कंपनीने केवळ 13 लाख डॉलर (सुमारे 9.59 कोटी रुपये) खर्च केले. अवैधरीत्या मोबाइल उपकरणे नियंत्रित केल्याप्रकरणी Xu Li, Zhu Ying, Jia Zhengqiang आणि Pan Qi असे 4 अधिकारी दोषी आढळले आहेत आणि प्रत्येकाला 2 लाख युआन (सुमारे 22 लाख रुपये) दंडासह 3 ते 3.5 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (हेही वाचा: 5G Connection in India: 2021 पर्यंत भारताला मिळू शकेल पहिले 5 जी नेटवर्क; 2026 पर्यंत असतील 35 कोटी युजर्स- Report)

दरम्यान, मोबाइल डिव्हाइसमध्ये हेतुपुरस्सर व्हायरस सोडून कमाई करण्याचे काम फक्त जिओनीनेच केले नाही, तर यापूर्वी अनेक चिनी व छोट्या कंपन्या अशा डावपेचांचा अवलंब करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिओनीपूर्वी इन्फिनिक्स आणि टेक्नो सारख्या मोबाइल निर्माता कंपन्यादेखील अशाच एका प्रकरणात दोषी आढळल्या आहेत.