भारतामध्ये पुन्हा TikTok सुरु होण्याची आशा मालवली; केंद्र सरकारने टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर घातली कायमस्वरुपी बंदी
TikTok (Photo Credits-Gettey Images)

गेल्या वर्षी भारताने चीनला (China) मोठा दणका देत देशात शेकडो चीनी अॅप्सवर (Chinese Apps) बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक  (TikTok) या लोकप्रिय अॅपचाही समावेश होता. त्या बंदीनंतर पुन्हा एकदा भारतामध्ये टिकटॉक सुरु होऊ शकते अशा बातम्या आल्या होत्या. मात्र आता नवीन अहवालामध्ये वेगळाच खुलासा झाला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (Ministry of Electronics and Information Technology) टिकटॉकसह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर कायमस्वरुपी बंदी (Permanent Ban) घालण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, चिनी अ‍ॅप्स कंपन्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत केंद्र सरकार समाधानी नाही. म्हणूनच ही 59 अ‍ॅप्स कायमची बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

हे अ‍ॅप्स भारताची अखंडता, एकत्रीकरण आणि सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात असे सरकारने जूनमध्ये दिलेल्या आदेशात म्हटले होते. म्हणूनच त्यावेळी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. हे अ‍ॅप्स व त्यांच्या वापराद्वारे डेटा गोळा केला जात असल्याबद्दल सरकारने प्रश्न उपस्थित केले होते आणि या अ‍ॅप्सच्या कंपन्यांकडून त्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. परंतु या नव्या अहवालात सूत्रांनी सांगितले आहे की, कंपन्यांनी सरकारला दिलेल्या उत्तरावर सरकार समाधानी नाही.

मंत्रालयाने सर्व कंपन्यांना काही प्रश्नांची यादीही पाठविली होती, ज्याचे त्यांना सविस्तर उत्तरे द्यायची होती. केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत या चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. यानंतर, गेल्या 6 महिन्यांत सरकारने 208 अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. लडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर मोदी सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. (हेही वाचा: FAU-G ची प्रतिक्षा अखेर संपली; पहा Android मोबाईल वर कसा कराल डाऊनलोड?)

गेल्या आठवड्यात सरकारने या कंपन्यांना नवीन नोटीस बजावली असून, त्यामध्ये म्हटले आहे की सरकार त्यांच्या प्रतिसादावर संतुष्ट नाही आणि त्यानंतर ही बंदी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्समध्ये TikTok, WeChat, UC Browser अशा लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे.