पृथ्वीवर जन्म घेतोय नवा ८वा खंड

शाळेत आपल्याला फक्त ७ खंडांबाबत माहिती होती, मात्र नुकतेच नैऋत्य प्रशांत महासागरात बव्हंशी पाण्याखाली बुडालेल्या अवस्थेत असलेल्या ‘झीलँडिया’ या पृथ्वीवरील नव्या आणि ८व्या  खंडाचा शोध लावल्याचा दावा न्यूझीलंडमधील भूवैज्ञानिकांनी केला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी मॉरीशस बेटाखालीसुद्धा एक खंड असल्याचा दावा केला होता. शास्त्रज्ञांच्या या संशोधनामुळे हिंदू-प्रशांत महासागराच्या गर्भात जणू एक नवे विश्वच उदयास आले आहे.

२१ वर्षांपासून अस्तित्वाची वाट पाहत असलेला... झीलँडिया!

ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला, नैऋत्य प्रशांत महासागराच्या खाली न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनियाची बेटं म्हणजेच या ‘झीलँडिया’ खंडाचा पाण्याच्यावर असलेला भाग होय. ४९ लाख चौरस किलोमीटरच्या या विशाल भूभागाला २० वर्षांनंतर खंड म्हणून घोषित करण्यात येत आहे (ही प्रक्रिया अजून चालू आहे).

कोट्यवधी वर्षांपासून जगातल्या वेगवेगळ्या खंडांमध्ये अनेक भूगर्भीय बदल झाले. आणि यामुळेच झीलँडियाचा भूखंड ऑस्ट्रेलियापासून वेगळा झाला असावा असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हा झीलँडिया भूखंड समुद्रपातळीपासून तब्बल १ किलोमीटर खाली आहे. हा भूखंड म्हणजे न्यूझीलंडच्या विविध बेटांचाच एकजीव असलेला भूभाग, त्याचा मोठा भाग समुद्राच्या पाण्याखाली आहे इतकंच. त्याचा आकार ऑस्ट्रेलिया खंडाच्या दोन-तृतीयांश इतका आहे. या झीलँडिया खंडावर असलेल्या काही पठारांची, पर्वतांची उंची जास्त आहे, त्यामुळे ते समुद्राच्या पाण्याबाहेर डोकावतात. त्याचाच एक भाग म्हणजे- न्यूझीलंडची बेटं. पण हा पाण्याच्या वर असलेला भूभाग केवळ ७ टक्के इतकाच आहे, बाकीचा ९३ टक्के भाग हा पाण्याखालीच आहे.

हा भूखंड असेल, तर मग पाण्याखाली का आणि कसा गेला? तर भूकवचाच्या सर्व प्लेट्सना मध्यावरणातील उर्जा ढकलत राहते, त्यामुळे या प्लेट्सची हालचाल होते. ही हालचाल लगेचच लक्षात येत नाही. मात्र, काही लाख, कोटी वर्षांनंतर ती स्पष्टपणे जाणवते. २२.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचे सर्व भूखंड एकमेकांच्या जवळ होते. त्या वेळी पृथ्वीचा नकाशा तयार केला असता तर संपूर्ण पृथ्वीवर जमिनीचा एकच भलामोठा भूभाग असल्याचं दिसलं असतं. मात्र मध्यावरणातील या ऊर्जेमुळे हे भूभाग एकमेकांपासून दूर गेले आणि त्याची परिणीती झीलँडियाच्या भूखंडामध्ये झाली.

पृथ्वीचा इतिहास असं सांगतो की, हवामानातील बदलांमुळे समुद्राची पातळी बऱ्याच प्रमाणात खाली-वर झाली आहे. त्या त्या काळात, आता पाण्याखाली असलेला बराच भूभाग उघडा पडला होता, तर आता उघडा असलेला बराच भूभाग पाण्याखाली झाकला गेला होता. त्यामुळे भूखंडांबाबत केवळ पाण्याखाली आहे की पाण्याबाहेर, हा निकष लावून चालणार नाही. नाहीतर वेगवेगळ्या कालखंडात भूखंड आणि समुद्र यांची रचना बदलावी लागेल. म्हणूनच त्याचे भूशास्त्रीय निकष अधिक मूलभूत ठरतात.

खंड म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या क्षेत्राचा आसपासच्या क्षेत्राच्या तुलनेत असणारा उठाव, विशेष भूगर्भीय संरचना, निश्चित क्षेत्रफळ अशा निकषांचा विचार केला जातो. झीलँडिया या खंडाला मान्यता मिळावी यासाठीची आकडेवारी जमवण्यासाठी शास्त्रज्ञ गेली दोन दशके प्रयत्न करीत आहेत अशी माहिती यावर संशोधन करणारे प्रमुख शास्त्रज्ञ निक मॉर्टिमर यांनी दिली आहे.

नवीन खंड, नवीन संशोधनासाठी नवे प्रश्न :

झीलँडियाच्या बाबतीतील सिद्धांत हे नवीन संशोधनाचे बीज आहे. भूवैज्ञानिक सिद्धांतांमते, फक्त पाण्यावरील भूभागालाच खंड मानले जाते. असे असले तर समुद्राखालील भागाला खंड म्हणून मान्यता द्यावी का ? हा एक मोठा प्रश्न आहे.

शास्त्रज्ञांनी हा खंड शोधून काढल्याचा दावा केला, सर्व जगाने त्यांची पाट थोपटली, शास्त्रज्ञांनाही स्वतःचा अभिमान वाटला मात्र या शोधासोबतच इतर अनेक जे प्रश्न उद्भवले आहेत. इथे आपल्याल्या विविध ठिकाणांवर भूगर्भीय हालचालींचा परिणाम कसा होतो, ज्वालामुखीचा परिणाम कसा होतो यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कारण झीलँडिया हा ऑस्ट्रेलियापासून वेगळा झालेला भाग मानला तर, भूगर्भीयहालचालींचा परिणाम न्यूझीलंड आणि न्यू कॅलेडोनियावर का झाला नाही? याचे उत्तर अजूनही शास्त्रज्ञांकडे नाही.

सध्या अस्तित्वात असलेल्या खंडांंविषयी काही तथ्ये :

• पृथ्वीचे क्षेत्रफळ ५१०.०७२  लक्ष चौरस किलोमीटर असून, त्याचा ७०.९२ टक्के भाग पाण्याने, तर  २९.०८ टक्के भाग जमिनीने व्यापला आहे

• आशिया हा सर्वांत मोठा खंड असून, पृथ्वीवरील जमिनाचा ३०% भाग त्याने व्यापलेला आहे. त्याचप्रमाणे हा सर्वांत जास्त लोकसंख्येचा खंड आहे.

• फक्त एक देश असलेल्या खंड ऑस्ट्रेलिया होय, तर सर्वात जास्त देश असलेला खंड आफ्रिका होय.

• एकही देश नसलेला खंड अंटार्क्टिका होय.

• उत्तर अमेरिकेच्यावर असलेला अलास्का हा रशियाचा भाग आशिया खंडातर्गत येतो.

• वाळवंट नसणारा खंड आहे युरोप.