साधारणपणे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जगावर ओढावलेल्या महामारीविरोधात पहिली प्रभावी लस शोधणाऱ्या संसर्गतज्ञ रुडॉल्फ वेगल (Rudolf Weigl) यांच्या जन्मदिनी गुगल ने खास डुडल साकारून अभिवादन केले आहे. आज त्यांची 138 वी जयंती आहे. रुडॉल्फ स्फीफन वेगल असे त्यांचे पूर्ण नाव असून ते पोलंडचे होते. डॉक्टर, संशोधक आणि संसर्गतज्ञ म्हणून त्यांनी मोठे कार्य केले. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी गुगल (Google) ने खास डुडल (Doodle) साकारले आहे. या डुडलमध्ये प्रयोगशाळेत काम करणारे वेगल दिसत याहेत. मागे जीवजतूंचे चित्र दिसत आहे. तर गुगल हा शब्द प्रयोगशाळेतील साहित्यातून साकारण्यात आला आहे. चॉकलेटी शेडमध्ये साकारलेले डुडल अत्यंत समर्पक वाटत आहे.
रुडॉल्फ स्फीफन वेगल यांचा जन्म 1883 साली ऑस्ट्रो-हंगेरी म्हणजे सध्याच्या झेक रिपब्लिक या ठिकाणी झाला. पोलंडच्या Lwów विद्यापीठातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1914 साली पोलिश आर्मीमध्ये पॅरासिटॉलॉजिस्ट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचदरम्यान युरोपमध्ये टायफस या जीवघेणा संसर्गजन्य रोगाने थैमान घातले होते. यात अनेक नागरिकांचा बळी जात होता. यावर पहिली प्रभावी लस शोधण्याचं काम वेगल यांनी केलं. 1936 साली त्यांच्या संशोधनाला यश आलं आणि टायफस विरोधात पहिली लस मिळाली. (Ludwig Guttmann Google Doodle: न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल; जाणून घ्या त्यांचे कार्य)
या लसीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टायफसच्या संसर्गापासून लाखो लोकांचे जीव वाचले. त्यामुळे वेगल यशस्वी संशोधक ठरले. तसंच यासाठी त्यांना तब्बल दोन वेळा नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. इतकंच नाही तर त्या काळात पोलंडवर जर्मनीने आक्रमक केलं होतं. त्यामुळे जर्मनीने या लसीची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याचे आदेश दिले. त्यावेळी वेगल यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने या लसीची निर्मिती करणारा मोठा प्लॅन्ट उभा केला.
दरम्यान, सध्याचा काळ कोविड-19 महामारीचा आहे. त्यामुळे महामारीचे भयंकर रुप आपण मागील दीड वर्षांपासून अनुभवतो आहोत. अशातच वेगल यांच्या कार्याचे मोल आपण अधिकच उत्तमरीत्या जाणू शकतो.