
चंद्रयान 2 (Chandrayaan 2) मोहिमेचे अपयश हे देशासह संपूर्ण जगाला चटका लावून जाणारे होते. ही मोहीम नक्की का फेल गेली याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. मात्र आता याबाबतचे कारण समोर आले आहे. चंद्रयान - 2 लँडर विक्रम (Vikram Lander) हे चंद्रावरील हार्ड लँडिंगमुळे अपयशी ठरले. नियमावलीनुसार विक्रमचा वेग कमी होणे गरजेचे होते, मात्र ते झाले नाही. सरकारने बुधवारी संसदेमध्ये याबाबत माहिती दिली. विक्रमच्या अपयशानंतर अडीच महिन्यांनंतर, भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (ISRO) अखेर सार्वजनिकपणे ही गोष्ट कबूल केली आहे.
विक्रमने चंद्रापासून सुमारे 500 मीटर उंचीवरून हार्ड लँडिंग केले होते. 7 सप्टेंबर रोजी विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित होते, परंतु भारताचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. अजूनही विक्रमचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. लोकसभेत केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंग यांनी लेखी उत्तरात सांगितले की, ‘लँडिंगच्या पहिल्या टप्प्यात विक्रम चंद्रपासून 30 किमी ते 7.4 किमी उंचीपर्यंत पोहोचण्यापर्यंत सर्व काही ठीक होते. यावेळी विक्रमची गतीही प्रति सेकंद 1683 मीटरवरून खाली येऊन 146 मीटर प्रति सेकंदावर आली होती.' (हेही वाचा: इस्रो कडून कार्टोसेट-3 लॉन्च करण्याची तयारी, भारताच्या सीमा सुरक्षिततेवर ठेवणार नजर)
'दुसर्या टप्प्यात विक्रमची गती निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त होती. लँडरच्या या असामान्य वागणुकीमुळे सॉफ्ट लँडिंग होणार असलेल्या परिस्थितीत बदल घडला. याचा परिणाम म्हणून चंद्रापासून अवघ्या 500 मीटर उंचीवर विक्रमने हार्ड लँडिंग केली. मात्र याव्यातेरिक्त आम्हाला चंद्रयान सुरू करणे, त्याची कक्षा बदलणे, लँडरला कक्षापासून वेगळे करणे, डी-बूस्टिंग अशा अनेक गोष्टींमध्ये यश मिळाले आहे.’ दरम्यान, चंद्रयान -2, ऑर्बिटमध्ये आल्यानंतर त्याने सर्व 8 टप्प्यात डेटा नुसार काम केले. चंद्रयान - 2 ने ज्या प्रकारे आपण कक्षा सुरू केली व कक्षा बदलली त्यामुळे या मोहिमेचे आयुष्य 7 वर्षांनी वाढले आहे.