चंद्रावर झेपावलेल्या विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यास NASA असमर्थ, वैज्ञानिक ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा प्रयत्न करणार
चांद्रयान 2 (Photo Credits-NASA)

इस्रो (ISRO) यांच्या चांद्रयान 2 (Chandrayaan 2) मोहिमेतील विक्रम लॅन्डर (Vikram Lander) सोबत संपर्क तुटल्याने आशा मावळल्या होत्या. मात्र नासा (NASA) यांनी इस्रोला मदतीचा हात पुढे करत त्यांच्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरच्या सहाय्याने विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यास प्रयत्न केले. मात्र नासाला सुद्धा विक्रम लॅन्डरचा शोध घेता आला नाही. परंतु ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा एकदा नासाकडून विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येणार असल्याचे तेथील वैज्ञानिकांनी म्हटले आहे. नासाच्या LRO वैज्ञानिकांनी असे सांगितले आहे की, विक्रम लॅन्डरचे लॅन्डिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून जवळजवळ 600 किमी दूर झाले होते. 17 सप्टेंबरला LRO यांनी तेथून उड्डाण सुद्धा केले होते. मात्र संध्याकाळची वेळ असल्याने त्या ठिकाणचे फोटो टिपता आले नाही. त्यामुळेच आम्ही चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यास असमर्थ ठरल्याचे नासाने म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला इस्रोचे प्रमुख के. सीवन यांनी असे म्हटले आहे की, चांद्रयान 2 मोहिमेतील ऑर्बिटर उत्तम काम करत आहे. तसेच त्यामधील सर्व पेलोड ही सुरळीत काम करत असून ऑर्बिटरने चांद्रच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. मात्र लॅन्डर सोबत अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही. परंतु ऑर्बिटर चंद्राच्या चहूबाजूंनी फिरत असून उत्तम प्रदर्शन करत आहे.(NASA ने घेतला चांद्रयान 2 च्या लॅन्डिंग साइटचा फोटो)

विक्रम लॅन्डरसोबत इस्रोचा संपर्क तुटल्यानंतर आता याची तपासणी राष्ट्रीय स्तरावरील कमिटी करत आहे. कमिटीकडून रिपोर्ट आल्यानंतरच भविष्यातील योजनेवर काम करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तर 21 सप्टेंबरला के. सीवन यांनी असे म्हटले की, चांद्रयान 2 मोहिमेनंतर आता गगनयान मोहिमेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

इस्रोकडून 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.50 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 2 मोहिमेतील विक्रम लॅन्डरने लॅन्ड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी विक्रमचे सॉफ्ट लॅन्डिंग ऐवजी हार्ड लॅन्डिंग झाले होते. त्यामुळेच संपर्क तुटला असल्याचे सांगण्यात येत आहे.